शीर्षक हेच वास्तव आहे. चाळीस हजारांपासून एक लाख किलोपर्यंत टोमॅटोचे बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करून शेतकरी लागवड करतात. यासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च येतो. रासायनिक खत, कीटकनाशक, मजुरी आदी खर्चाने शेतकऱ्यांचे खिसे खाली होतात. आशा एकच असते, पीक विकून दोन पैसे मिळतील. परंतु तेही नाही. कारण सध्या टोमॅटोचा भाव ३० ते ५० रुपये कॅरेट बाजारात आहे, जवळपास एक ते दीड रुपये किलो. त्यामागेही तोडण्यासाठी मजुरी, बाजारात नेण्याकरिता गाडी भाडे, बाजार चिठ्ठी, हमाली अशा विविध खर्चाने शेतकऱ्याच्या हातात एकही पैसा उरत नाही व त्याचा माल फुकट जातो. काहींचा टोमॅटो शेतातच सडतोय. याकडे शासनाचे लक्ष जाईल काय?
त्याला कष्टाचा मोबदलाही धड मिळत नाही. टोमॅटोप्रमाणे पत्ताकोबी, वांग्याचेही बेहाल आहेत. पीक विकावे तरी कुठे? या विवंचनेत शेतकरी गुंतला असून कर्जबाजारी झाला आहे. आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे सतत भेडसावत आहे.
शेतकरी समोर न जाता मागेच येत आहे. पाच एकर जमिनीच्या उत्पन्नात शेतकरी वर्षभर परिवारासह उदरनिर्वाह करू शकत नाही, उलट मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतो. कारण एक रुपयाचे उत्पन्न तर दीड रुपये खर्च, अशी स्थिती आहे. शंभरातून दोन शेतकऱ्यांना फायदा व अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना नुकसान म्हणून शेतकऱ्यांची लेकरे लहान-मोठी नोकरीच बरी म्हणतात. शेतकऱ्यांच्या वाली कुणी नाही. त्यांचे अश्रू पुसायला कोण धावेल, कुणी नाही. उलट एखाद्या वेळी भाजीपाला बाजार भाव वाढले, तर जिकडे-तिकडे हाहाकार, याबाबत पवनारा, बघेडा, लोहारा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या मुखातून वास्तविकता ऐकायला मिळाली आहे.