संपूर्ण भंडारा जिल्ह्यात कोरोनाचे वादळ घोंगावत आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या वादळाला शासनासह जनसामान्यांनी पेलून संकटाचा धैर्याने सामना केलेला होता. तीच आठवण पुन्हा झाल्यास अंगावर काटे उभे होतात. बागायतदाराला पुन्हा लाॅकडाऊन होऊ नये असे वाटत आहे. कारण गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून लाॅकडाऊनचा सामना बळीराजाला करावा लागला होता. या लाॅकडाऊनच्या काळात साधा प्रवासाचा खर्चही निघत नव्हता. मजुरांची मजुरी तर दूरच! भाजीपाला शेतातच सडवावा लागला. होत्याचे नव्हते होत कर्जाचा डोंगर वाढत गेला. उधारीवर कृषी निविष्ठा खरेदी केल्याने पैसे अंगावर अजूनही थकीतच आहेत. बियाण्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाचे संकट बळीराजाला भयावह वाटत आहे.
दररोज कोरोनाची अपडेट चिंता वाढवणारी वाटत आहे. वरिष्ठ स्तरापासून ते कनिष्ठ स्तरावरील प्रशासन दररोज जनसामान्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र मोजकेच लोक नियमांचे पालन करीत दैनंदिन नियोजन करीत आहेत. बहुतांशी जनतेला अजूनही कोणाचे भय वाटत नाही. त्यांच्यामुळे इतरांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.