लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्राला बसत असताना आता संचारबंदीने भाजीपाला पिकविणारे शेतकरीही उद्ध्वस्त होत आहेत. शेतात पिकलेला भाजीपाला कुठे विकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घाम गाळून पिकविलेला भाजीपाला अनेक शेतातील बांधांवर सडत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे. प्रचंड मेहनत करून पिकविलेले पीक मातीमोल होताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची कालवाकालव होत आहे. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेणे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेची उपलब्धता गत पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात बहुतांश शेतकरी भाजीपाला पीक घेत आहे. परंतु गतवर्षी पासून कोरोना संसर्गाने भाजीपाला उत्पादक मोठ्या अडचणीत आले आहे. गतवर्षी बसलेला फटका भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या जोमात भाजीपाला पिकाची लागवड केली. टोमॅटो, वांगे, भेंडी, कारले, मिरची, चवळी यासह विविध पिके लावली. मात्र, गत महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यातच अलीकडे संचारबंदी घोषित केल्याने बाजारपेठाही बंद झाल्या आहेत. परिपक्व झालेला भाजीपाला तोडणे गरजेचे असते. मात्र, बाजारपेठच बंद आहे तर माल विकायचा कुठे, असा प्रश्न आहे. काही शेतकऱ्यांनी तर टोमॅटोसारखे पीक तोडून बांधावर फेकून दिले आहे.
भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नाही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला विकण्याचा या काळात प्रयत्न चालविला आहे. मात्र, तोडणीची मजुरी, वाहतुकीचा खर्च आणि बाजारातील भाव याचे गणित लागत नाही. दहा किलो वांगी विकून भजी खाण्याएवढेही पैसे घरी येताना शेतकऱ्याच्या हाती येत नाहीत. सध्या भाजीपाल्याचे भाव खाली आले आहेत. ठोक दरात वांगी पाच रुपये किलो, भेंडी दहा रुपये किलो, कारले १२ रुपये किलो, टोमॅटो चार रुपये किलो, तर चवळी दहा रुपये किलो आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता शेतातील भाजीपाला तोडतच नसल्याचे दिसत आहे.एकरी ५० ते ६० हजारांचे नुकसान भंडारा जिल्ह्यात तंत्रशुद्ध पद्धतीने भाजीपाला पीक घेतले जाते. मल्चिंग पेपर, ठिंबक सिंचन व तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भाजीपाला पिकातून शेतकऱ्याला एकरी सरासरी ५० ते ६० हजार रुपये मिळतात. मात्र, सध्याची स्थिती पाहता हातात काहीही येण्याची शक्यता दिसत नाही. पालांदूर येथील प्रभाकर कडुकार म्हणाले, यंदा शेतात टोमॅटो आणि वांगी लावली आहेत; परंतु बाजारपेठ बंद असल्याने शेतातच माल झाडाला तसाच आहे. संचारबंदीत माल विकावा कुठे, असा प्रश्न आहे. बळिराम बागडे म्हणाले, कारले आणि भेंडीच्या भरवशावर वर्षभराचे नियोजन केले होते; परंतु आता कोरोना संचारबंदीने आम्ही पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहोत. संचारबंदी काही काळ वाढविण्यात आली तर आम्हाला शेतातील माल फुकटात वाटायची वेळ येईल.