चंद्रपुरातील दारूबंदी सरकारने उठविली. निर्णय जरी झाला असेल तरी अंमलबजावणीस उशीर लागणारच. विलंबाचा पुरेपूर फायदा दारू तस्कर घेत आहेत. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पवनीवरून देशी-विदेशी दारूचे बाॅक्स भरून भरधाव वेगाने सावरला-ब्रम्हपुरी मार्गे जात होते. पवनीपासून अर्धा किमी अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन उलटले. यातील दारूचे बक्से रस्त्यावर विखुरले. हा प्रकार येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या लक्षात आला. अपघातातील जखमी चालकाला मदत करण्याचे सोडून देशी दारूचे पव्वे, विदेशी दारूच्या बाटल्या लांबवणे सुरू केले. तेथे कुणीच नसल्याने तळीरामांनी मनसाक्त दारू लुटली. काही वेळातच वाहनातून दारू पळविण्यात आली. चालक नशीबवान म्हणून या अपघातातून बचावला. वृत्त लिहेपर्यंत पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. एक मात्र झाले या अपघाताने तळीरामांची चंगळ झाली. तर उशिरा पोहचलेले आपल्याला दारू मिळाली नाही म्हणून हळहळत होते.
वाहन उलटले अन् येणाऱ्या-जाणाऱ्यांनी लुटली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:25 AM