संतोष जाधवरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५९१ वाहनधारकांवर लायसन्स निलंबन तसेच वाहतूक परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. गत वर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असतानाही जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखेने २०१९ मध्ये ४९५ वाहनधारकांवर तर नवीन वर्षात ९६ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये मोबाईलवर बोलणारे १५७ वाहनधारक तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३३५ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. रेड सिग्नल जम्पिंगमध्ये जानेवारी महिन्यात चार तर ड्रंक अँड ड्राईव्ह केसेसमध्ये जानेवारी महिन्यात ५ तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक नोव्हेंबरमध्ये एक अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. नवीन वर्षात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी फिरते पथक तैनात केले आहे. त्यामुळे नववर्षात अवघ्या दोन महिन्यात ९६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोबाईलवर बोलत वाहने चालविणाऱ्या २९ वाहनधारकांवर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६७ वाहनधारकांवर तर सिग्नल तोडणाऱ्या चौघांवर कारवाई झाली आहे. गत वर्षभरात नियम मोडणाऱ्या तब्बल सात हजार २३१ वाहनांवर वाहतूक शाखेच्या इंटरसेप्टर वाहनातर्फे कारवाई करण्यात आली होती. या वाहनधारकांना ४७ लाख ११ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केल्याने नागरिकांनीही आता धास्ती घेतली आहे.
वाहन चालविताना लायसन्स आवश्यक अनेक पालक आपल्या पाल्यांना दुचाकी घेऊन देतात मात्र १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच अनेक जण दुचाकीसाठी आपल्या पालकांकडे हट्ट धरतात. नाईलाजाने पालक पाल्यांना गाडी देतात. मात्र आता वाहतूक पोलिसांकडून लायसन्स विना फिरणाऱ्या दुचाकी धारकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच मालवाहू गाडीतून प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास त्यांचा वाहतूक परवानाही रद्द करण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन न केल्यास आढळून आल्यास अशा धारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करणे सुरू आहे. भंडारा शहरात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी नागरिकांनीही पोलिसांना अपेक्षित सहकार्य करण्याची गरज आहे.-शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, भंडारा