तक्रारदारच संशयाच्या भोऱ्यात : स्थानिक गुन्हे शाखेने लावला २४ तासांत छडाभंडारा : रात्रीच्या सुमारास घरासमोरील चारचाकी वाहन चोरी गेल्याची तक्रार पेट्रोलपंप येथील सुरेश जगनाडे यांनी जवाहरनगर पोलिसात दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने करून अवघ्या २४ तासात वाहनचोरीचा छळा लावला. यात तक्रारदारानेच वाहनावरील कर्ज माफ व्हावे व विम्याची रक्कम मिळावी यासाठी नाटक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे वाहनमालकच आता संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.पेट्रोलपंप ठाणा येथील सुरेश जगनाडे यांनी २०१५ मध्ये एक सफेद रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३१ इए २६३२ ही नागपूर येथून खरेदी केली होती. त्यांनी मंगल फायनान्स कंपनीचे यासाठी कर्ज घेतले होते. ही गाडी ते भाडेतत्वावर चालवित होते. दरम्यान सदर वाहन नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील घोटमुंढरी येथील उदय पांडे यांच्यासोबत १ लाख २० हजार रूपयात विक्रीचा सौदा केला. याबाबत विक्रीपत्र तयार करून पांडे यांच्याकडून ५० हजार रूपये रोख घेतले. उर्वरित रक्कम २१ मार्चला घेणे होते.दरम्यान पांडे यांनी जगनाडे यांना गाडीसह कागदपत्र घेऊन या व उर्वरित रक्कम घेऊन जाण्यासंबंधी फोन केला. यावरून जगनाडे यांनी २९ मार्चला सकाळी पांडे यांच्याकडे वाहन नेऊन त्यांच्या घरासमोर उभे करून कागदपत्र दुसऱ्या दिवशी सकाळी आणून देतो असे सांगुन निघून गेले. जगनाडे हे दुसऱ्या दिवशी ३० मार्चला सकाळी पांडे यांच्याकडे घोटमुंढरी येथे गेले. यावेळी पांडे यांना कागदपत्र न देता उलट वाहनचोरीची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे जगनाडे हे खोट्या चोरीच्या प्रकरणात फसविणार असा संशय आल्याने पांडे यांनी अरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.दरम्यान जवाहरनगर पोलीस ठाण्यात वाहनचोरीच्या दाखल तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्याकडे सोपविला.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सुत्रे तातडीने हालविली. यावेळी फिर्यादी सुरेश जगनाडे याच्याकडून माहिती घेतली असता त्याने दिलेली माहिती ही संशयास्पद वाटली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच जगनाडे याने वाहनचोरीची सत्यता कथन केली, ते ऐकून पोलीस चक्रावले. यात त्याने, पांडे यांना वाहन विकले होते. मात्र, गाडी फायनान्सवर घेतली असल्याने ते माफ व्हावे व गाडीचा विमा रक्कम मिळावी, या उद्देशाने वाहन चोरीची खोटी तक्रार दाखल करून पोलिसांची दिशाभूल केल्याचे कबूल केले.याप्रकरणातील वाहन घोटमुंढरी येथील पांडे यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश काळे, पोलीस हवालदार वामन ठाकरे, बंडू नंदनवार, राजेश गजभिये, मिलींद जनबंधू यांनी केली. (शहर प्रतिनिधी)
कर्जमाफीसाठी दिली वाहन चोरीची खोटी तक्रार
By admin | Published: April 02, 2017 12:21 AM