तुमसर : राज्य शासनाने तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर मागील वर्षी पुरविले होते. परंतु ते हाताळण्यासाठी मनुष्यबळ नाही म्हणून ते व्हेंटिलेटर रुग्णालयात धूळखात पडून आहेत. जर हे दोन व्हेंटिलेटर उपयोगात आणले असते तर ह्यामुळे परिसरातील अनेक कोविड रुग्णांचा जीव कदाचित वेळेवर उपचार मिळाल्याने वाचू शकला असता किंवा हेच दोन व्हेंटिलेटर मनुष्यबळअभावी जर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठवून उपयोगात आणले असते तर अनेक कोविड रुग्णांना त्याचा फायदा झाला असता. परंतु निष्क्रिय जिल्हा आरोग्य प्रशासन झोपेत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध असतांनी त्याचा वापर न करता, रुग्णांना मरणाची वाट मोकळी करून देण्याचे महापाप केले असून दोषी अधिकाऱ्यांविरोधात ताबडतोब कार्यवाही करून हे व्हेंटिलेटर त्वरित आरोग्यसेवेत दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी केली आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेमध्ये फक्त भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. खासगी रुग्णांलयाचे दर जास्त असल्यामुळे सामान्य रुग्णांना हे दर परवडण्यासारखे नसल्याने रुग्णांचा कल हा शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयांकडेच जास्त असतो. त्यामुळे शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची मागणी शिवसेनेने यापूर्वी केली होती. परंतु जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. यासंदर्भातील निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे पंचायत समिती माजी उपसभापती ललित बोन्द्रे, शिवसेना विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेनेचे पवन खवास उपस्थित होते.