सुवर्ण महोत्सवी वर्ष : भंडारा, मोहाडी व लाखनी तालुक्यात उपक्रमभंडारा : विश्व हिंदू परिषदेने सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान हाती घेतले आहे. संपूर्ण जिल्ह्यात ११ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. वृक्ष लागवड आणि संवर्धनातून पयार्याने पर्यावरणाचे रक्षण होते. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येऊन एक संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले असून विविध सामाजिक संस्था, धर्म, पंथ, संप्रदाय यांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. भंडारा, मोहाडी व लाखनी येथे या उपक्रमाला विधिवत प्रारंभही झाला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषदेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हिंदू धर्म, समाज, मानवाच्या कल्याणाचा दृष्टीने हे आयोजन होत आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध सामाजिक, धार्मिक संघटना, पंथ, संप्रदाय यांना सोबत घेऊन विश्व हिंदू संघटनेच्या वतीने ११ हजार झाडे लाऊन त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लाऊन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रखंड आणि खंड स्तरावर हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. लाखनी, मोहाडी तालुक्याच्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा येथे या कार्यक्रमाला विधीवत सुरुवात करण्यात आली. शास्त्री नगर भागातील गणेश मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्ष आयोजन समितीचे अध्यक्ष उद्धव डोरले, बळवंत मुकेवार, नगर संघचालक अनिल मेहर, माजी उपमुख्य कार्यपालन अधिकारी वसंत नेमा, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, अशोक घाडगे उपस्थित होते. यावेळी मुकेवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकेतून डॉ.संजय एकापुरे यांनी वृक्षलागवड व संवर्धनामागची भूमिका विषद केली. सोबतच प्रत्येकाने आपल्या घरी धर्मरक्षा निधी संकलीत करून विश्व हिंदू परिषदेच्या ईश्वरीय कार्याला हातभार लावण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अशोक घाडगे यांनी पौराणिक दाखले देत वृक्षलागवड व त्यातून पर्यावरण संरक्षण हा विषय मांडला. पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच धर्मरक्षण होय. वृक्ष कापले जाऊ नयेत म्हणून अनेक वषार्पूर्वी आंदोलने झाली. विश्व हिंदू परिषदेचे कार्य हे धर्मरक्षणाचे आहे. पर्यावरण रक्षण हेही धर्मरक्षणच आहे. प्रत्येक नागरिकाने या धर्मकार्यात सहभागी होऊन हातभार लावावा, असेही आवाहन अशोक घाडगे यांनी या वेळी केले. या प्रसंगी मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आल्यानंतर नागरिकांना रोपटे लागवडीकरिता देण्यात आले. संचालन प्रसन्ना महाजन यांनी केले. आभार शुभदा देवगडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा संघचालक रामभाऊ चाचेरे, अनिल मेहर, विभाग संघटनमंत्री सागर खेडकर, जिल्हा सहमंत्री प्रसन्ना महाजन, प्रभात मिश्रा, डॉ.नितीन तुरसकर, सुधीर धकाते, आशिष मोहबे, मनोज साकुरे, अनिल नायर, बजरंग दलाचे दीपक कुंभारे, मनीष बिछवे, राहुल ढोमणे, कमलेश नंदूरकर, युथ फॉर नेशनचे मोहित वडदकर, आदित्य मोटघरे, मकरंद खानापुरकर, प्रेरिता हरदास, प्रांजल घोनमोडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले. (नगर प्रतिनिधी )
'विहिंप'चा ११ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
By admin | Published: July 06, 2015 12:38 AM