लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यातच परतीच्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांचे पंधरा महिन्यांचे मानधन तत्काळ देण्यात यावे, तसेच वृद्ध श्रावणबाळ लाभार्थी, दिव्यांग निराधारांचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी तत्काळ देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी विदर्भवादीशेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारासमोर आंदोलन केले होते. यावेळी सल्लागार ईश्वर नंदागवळी यांनी शासनाला वारंवार निवेदन देऊनही निराधारांचे मानधन, तसेच उमेद अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी टाळाटाळ होत असल्याचे सांगितले. यावेळी शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक अडचणी महिलांना येत असून, विदर्भवादीशेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी यावेळी संतप्त झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्यस्तरावर या समस्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी संदीप कदम यांना विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सदानंद धारगावे, उपाध्यक्ष यादव मेंगरे, सल्लागार ईश्वर नंदागवळी, धनराज इखार, दिगंबर गिरडकर, बाबूराव सुखदेवे, सहसचिव बबन सहारे, सदस्य देवीदास धारगावे, यादव इखार, मुन्ना मुंडले, राजू मेश्राम, सुनीता मेश्राम, चंदू मेश्राम, चंदू सावरबांधे, वामन रामटेके, रवी गणवीर यांच्या उपस्थितीत शेतकरी, महिला, उमेदच्या कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने केलेल्या आंदोलनामध्ये उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या ग्राम प्रेरिका बँक, सखी, पशूसखी, सखी, वर्धिनी, प्रवर कृषी व्यवस्थापक यांचे गेल्या वर्षभरापासूनचे मानधन तत्काळ दिवाळीपूर्वी देण्यात यावे, तसेच वृद्ध निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग, निराधारांचे तीन चार महिन्यांपासूनचे थकीत मानधन तत्काळ द्यावे, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच धान पिकाचेही रोग व किडीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच धानाचा बोनस जाहीर करावा, धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, कर्जमुक्ती योजना चालू खातेदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्याच्या आश्वासनानुसार तत्काळ लाभ देण्याची मागणी विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या विविध मागण्या जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे तत्काळ पोहोचवून शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील उमेद अभियान कर्मचारी, तसेच वृद्ध निराधारांना दिवाळीपूर्वी मानधन द्यावे, अन्यथा पुन्हा एकदा विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.