आॅनलाईन लोकमतभंडारा : नागरिकांकडून पैसे घेऊन व्हिडिओ पॉर्लर सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत एक लाख ७६ हजार ४५० रूपयांच्या मुद्देमालासह ११ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पवनी पोलिसांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात केली.अरूण शेंडे, दिलीप मेश्राम, मनोहर बावनकर, अमिन खान, कपिल राऊत, मारोती तेलमासरे, इमरान शेख, मोहन तुरस्कर, रोषन मुंडले, पिंकू लांजेवार, रामचंद्र पाटील अशा ११ जणांना व्हिडीओ पॉर्लरमध्ये पैशाचा जुगार खेळताना ताब्यात घेतले. पवनी येथील बेलघाटा वॉर्डातील अरूण शेंडे हे त्यांच्या ताब्यातील घरात स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे घेऊन व्हिडीओ मशीनच्या माध्यमातून पैसे हार-जीतचा जुगार खेळवित होता, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी पवनीचे पोलीस निरीक्षक एस.बी. ताजने यांच्या पथकासह जुगार सुरू असलेल्या घरावर सोमवारला छापा घालून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ७६ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कोल्ड्रींक सेंटरमध्ये दारू विक्रीअड्याळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पहेला येथील धनराज चवरे यांच्या मालकीच्या तिलक कोल्ड्रींक सेंटरमध्ये मागील काही दिवसांपासून देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाला. सेंटरवर टाकलेल्या छाप्यात कोल्ड्रींक दुकानाच्या नावाखाली दारूविक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यात १६ शिशा विदेशी दारूचे तर १६ शिशा देशी दारूचे असा चार हजार ३०७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.