विधान परिषद निवडणूक : जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य पर्यटन वारीवरप्रशांत देसाई भंडारा१९ नोव्हेंबरला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगर परिषद सदस्य व नगर पंचायत सदस्य पर्यटनवारीवर आहेत. मंगळवारला दुपारी जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता एकही पदाधिकारीही उपस्थित नसल्याचे आढळून आले. पदाधिकाऱ्या अनुपस्थितीमुळे कामे घेऊन आलेल्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागले. तर कामे घेऊन येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ थांबल्याचे दिसून आले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी अत्यंत चुरशीची होणारी विधान परिषदेची निवडणूक १९ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन, भाजपकडून डॉ. परिणय फुके तर काँग्रेसकडून प्रफुल अग्रवाल यांच्यात तिहेरी लढत होत आहे. या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील काही पदाधिकारी दिवाळीपुर्वी तर काही पदाधिकारी दिवाळीनंतर पर्यटनवारीवर निघाले आहेत. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व ग्रामीणांची नाळ जुडून असलेल्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य पर्यटनवारीवर आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहचत आहे. अशातच अनेकांना ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याने पळवाटा सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे.ग्रामीण जनतेची विविध कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असतात. जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेले सदस्य ग्रामीणांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत असतात. मात्र विधान परिषद निवडणुकीमुळे येथील सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषदेत आता एकही पदाधिकारी किंवा सदस्य दिसून येत नसल्याने कामासाठी आलेल्या ग्रामीण जनतेला आल्यापावली परतावे लागत आहे. सहा वर्षानंतर येत असलेल्या या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगर सेवक व नगर पंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क असतो. सत्तेच्या सारीपाटात घोडेबाजारी सुरू असून मतदारांना ‘हायजॅक’ केले जात आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत पदाधिकारी दिसेनासे झाले आहेत. एरव्ही ग्रामीण भागातील नागरिकांनी गजबजून राहणारे जिल्हा परिषद आता पदाधिकारी व सदस्यांविना ओस पडलेली आहे. सदर प्रतिनिधीने आज दुपारी जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, बांधकाम व आरोग्य सभापती विनायक बुरडे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम हे आठवडभरापासून जिल्हा परिषदेत आले नसल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. या पदाधिकाऱ्यांची दालने नागरिकांच्या वर्दळीने नेहमी जशी गजबजून राहत होती. तशी गर्दी मात्र विधान परिषद निवडणुकीमुळे नसल्याचे जाणवले. ही सर्व नेतेमंडळी पर्यटनासाठी बाहेर गेल्यामुळे त्यांच्या कक्षात शुकशुकाट दिसून आला. ही परिस्थिती १९ नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसापर्यंत बघायला मिळणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा वचक असला तरी या निवडणुकीमुळे पदाधिकारी व सदस्य भारतभ्रमणावर गेल्यामुळे जिल्हा परिषदेची सुत्रे आता अधिकारी हाताळत आहेत. पदाधिकाऱ्याअभावी अधिकाऱ्यांचीही उपस्थिती मंदावली आहे.
जिल्हा परिषदेत ग्रामीणांची वर्दळ थांबली
By admin | Published: November 09, 2016 12:40 AM