अडयाळ : मागील काळात जिल्ह्यात एटीएम तोडफोडीच्या घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरात जिल्हा पोलीस विभागाने दिशानिर्देश दिले होते. अड्याळ येथील तीनपैकी एका एटीएममध्ये विद्युत दिव्यांची सोय करण्यात आली, तर गावात पथदिव्यांची सोय अजूनही झालेली नाही.
प्रत्येक पोलीस स्टेशन येथे संबंधित एटीएम चालक तथा देखभालीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी तथा गावातील व्यावसायिकांची बैठक घेऊन पोलीस विभागाने सूचना दिल्या होत्या. त्या म्हणजे तात्काळ गार्डची नियुक्ती तथा तेथील कॅमेरे व विद्युतची व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्यात यावी असा आदेश असतानाही फक्त एका लाइटची व्यवस्था होत नसेल तर मग काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होतो.
एकट्या अडयाळमध्ये फक्त तीन एटीएम असले तरी त्यात अनेक महिन्यांपासून लाइट नाही. एका मशीनचे स्क्रीन काम करीत नाही. रोज हजारोंचा व्यवहार होतो, रूमचा किराया जातो, विद्युत बिलही वेळेवर दिले जाते; पण एक पन्नास रुपयांचा लाइट तिथे लावला जात नाही. असे एटीएम आहेत की जिथे आजही गार्ड तथा लाइट उपलब्ध नाही. गावातील पथदिव्यांचीही अशीच अवस्था आहे.