देवरी : मागील काही महिन्यापासून मरामजोब व मासुलकसा गावात नियमित वीज पुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज शुक्रवारला विद्युत कार्यालयाचा घेराव करीत मुख्य अभियंत्याला धारेवर धरले.भाजपा कार्यकर्ता मनोज मिश्रा यांच्या नेतृत्वात मरामजोब व मासुलकसा गावातील शेकडो लोकांनी मोर्चा काढून विद्युत विभागाचे उपविभागीय कार्यालय गाठले व मुख्य अभियंता संजय वाकडे यांना आपल्या समस्यांची जाण करुन देत खडे बोल सुनावले व त्यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.विशेष म्हणजे मागील काही महिन्यापासून या दोन्ही गावांमध्ये दिवसभर विद्युत पुरवठा बंद असतो कारण या दोन्ही गावांना मिळून एक १०० किलोवॅटचे ट्रान्स्फार्मर लागलेले आहे. त्यावर अतिरिक्त भार येत असल्याने ट्रॉन्स्फार्मरमध्ये बिघाड येत असतो. क्षेत्रात लाईनमनची नियुक्ती नसल्यामुळे लाईन दुरुस्त करायला कुणीच येत नाही. या क्षेत्राचे इंजिनिअर सुद्धा ग्रामीणांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रबीच्या पिकांचे फार मोठे नुकसान होत आ हे. वरुन उष्णता वाढल्याने लोकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीणांना आर्थिक शारीरिक व मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून भाजप कार्यकर्ते मनोज मिश्रा यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून मुख्य अभियंता संजय वाकडे यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात ४०० किलोवॅट ट्रॉन्स्फार्मर लावणे, विद्युत खंडीत होण्याची तक्रार मिळताच दुरुस्त करणे, रात्रीच्यावेळी पेट्रोलिंगकरिता चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यासंबंधीची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा आक्रोश पाहता मुख्य अभियंता संजय वाकडे यांनी फंड मिळताच लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. या वेळी मनोज मिश्रा, विकास शहारे, बाबलू कोरे, द्वारका हत्तीमारे, रामू कातोरे, धम्मदीप शहारे, लोकेश राऊत, तेजपाल लाडे, धम्मू लाडे, राजवर्धन शहारे व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: May 29, 2015 12:54 AM