तुमसर : खरं तर पोलीस विनंती करीत नाही, तर नियम व कायद्याच्या भाषेने बोलतो; पण कोरोनाने मात्र कायदा, नियम, दंडुकशाही यापलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडले आहे. कोरोनाने तर पूर्ण परिसरच व्यापला आहे. पोलीस कुठे कुठे पुरतील?
आता वेळ आली आहे स्वतःच पोलीस व्हायची व स्वतःवरच नियंत्रण ठेवायची. त्यामुळे आता तुम्ही स्वतः एक पोलीस व्हा व स्वतःवर नियंत्रण मिळवा, अशी भावनिक साद गोबरवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक पाटील यांनी परिसरातील ग्रामीण जनतेला घातली.
एरवी एखाद्या गावात, विशिष्ट भागांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की, पोलीस तात्काळ जाऊन त्यावर नियंत्रण मिळवितो. कारण परिसर लहान व प्रमाणात मनुष्यबळ त्यामुळे ते शक्य होते. गत काही दिवसांपासून कोरोनाने परिसरात कहर माजविला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याशी हसतहसत बोलणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी येते. आपल्याला त्याच्या अंत्यसंस्कारालाही जाता येत नाही. असे हे ‘न भुतो न भविष्यती’ असे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे.
काळ आला आहे; पण वेळ येऊ द्यायची नाही. माझं घर, माझं गाव, माझा तालुका आणि माझा जिल्हा जर कोरोनाच्या तावडीत येऊ द्यायचा नसेल, तर आपल्याला जाणीव ठेवून वागावे लागेल ही खूणगाठ आधी मनाशी बांधा. कदाचित तुमच्या चुकीमुळे तुम्ही घरात कोरोना आणून एकाची सुरुवात व एकाचा शेवट खराब करू शकता. काठी घेऊन तुमच्यामागे पळताना आम्हालाही वाईट वाटते. कोरोनाची भयानकता फक्त पोलिसांना समजली आहे आणि जनतेला नाही, असे तर नाही ना.
कोरोना पसरू नये ही जबाबदारी फक्त पोलिसांनीच नाही, तर ती समुदायाची, कुटुंबाची व शेवटी स्वतःची आहे. परिणामी आता तुम्ही स्वतः एक पोलीस व्हा. स्वतःच नियम पाळा, इतरांना सांगा. थोड्या दिवसाचा हा काळ आहे. संयम बाळगा, असे भावनिक आवाहनही ठाणेदार दीपक पाटील यांनी ग्रामीण जनतेला केले.