लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मोहाडी तालुक्यातील नेरी ग्रामस्थांचा सहा महिन्यापासून अवैध रेती उत्खनन विरुद्ध लढा सुरु आहे. नदी पात्रातील रेती उत्खननाने कोरडी पडलेल्या नदीत पाणी नसल्याने गावातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याची रीतसर तक्रार तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना केली होती. महसूल विभाग व रेती माफिया यांच्या अंतर्गत सोटेलोटे असल्याने कारवाई होत नव्हती. कारवाई होत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी आज सकाळपासून एल्गार आंदोलन पुकारले.सरपंच आनंद मलेवार यांच्या नेतृत्वात शेकडो ग्रामस्थांनी नदी पात्रात जाऊन आंदोलन केले. सादर आंदोलन तब्बल ८ तास सुरु होते. तहसीलदार मोहाडी यांच्या आश्वसनानंतर तूर्तास आंदोलन माघे घेण्यात आले. पण कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.तालुक्यातील नेरी हे गाव सूर नदीच्या काठावर वसलेले आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. यामुळे नदी पात्र लगत असलेल्या शेकडो एकर शेतातील पिकावर लोकांचे जीवन अवलंबून आहे. पण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्याने शेतकऱ्यांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबद सहा महिन्यापासून कागदोपत्री व्यवहार करूनही त्यांनी कारवाई एली नाही. यावर गावकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत कारवाई न झाल्याने गावक?्यांनी स्वत:च एल्गार पुकारून आंदोलन करण्याचा निर्धार करून सदर माहिती महसूल विभागाला देण्यात आली. पण रेती उत्खनन थांबले नाही. म्हणून आज सकाळी सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाडे, शोभाराम तिजारे यांच्यासह ५०० च्यावर महिला पुरुषांनी नदीपात्रात आंदोलन केले.ग्रामस्थ तूर्तास शांत, पण भूमिकेवर ठामआंदोलन होणार असल्याने सकाळपासून वरठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. बी ताजने . उपनिरीक्षक विवेक राऊत यांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार घटना स्थळावर आल्याशिवाय हलणार नाही संकल्प ग्रामस्थांनी घेतला. घटनास्थळावर यायला तयार नसलेल्या तहसीलदारांना अखेर घटनास्थळावर येणे भाग पडले. रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षेत तलाठी काही लोकांची समिती बनवून नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. यासाठी पोलीस विभागाला पत्र देऊन रीतसर कारवाई करण्याचे त्यांनी सांगितल्यावर आंदोलन तूर्तास शांत झाले. पण कारवाई न होऊन रेती चोरी न थांबल्यास पुन: आंदोलन करू या भूमिकेवर गावकरी ठाम होते.
रेती माफियांविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:57 PM