आठ दारु अड्यांवर छापे : ४३ हजारांची दारु जप्त, महिलांचीही उपस्थिती संजय मते आंधळगाव दारुविक्रीला उधाण आले होते. यामुळे गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. स्वातंत्र्यदिनी आंधळगावच्या पोवराई सभागृहात आमसभेचे आयोजन केले होते. यात गावाच्या विकासासंबंधी आराखडा तयार करून सर्वानुमते आमसभेचे अध्यक्ष सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय मते व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, गावकरी यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले. त्यातच गावातील अवैध व वैध दारु विक्रीसंबंधी महिलांनी ठराव घेऊन एल्गार पुकारला व गावात दारुबंदीचा निर्णय घेऊन महिला व युवकांनी मोर्चा काढून पोलिसांसोबत अवैध दारु विक्रेत्यांच्या घरावर हल्लाबोल करीत छापे घालुन दारु पकडली. आंधळगाव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, विनोबा भावे, अनुसया माता, गुलाबबाबा आदी थोर संतांच्या पदपावन स्पर्शाने हे गाव पावन झालेले आहे. या गावात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सर्वोदय कार्यकर्ते सुद्धा आहेत. यातच १९९३ मध्ये येथील स्वर्गीय डॉ.बापट यांच्या माध्यमातून ग्रामजागृती करून दारुबंदी मोहीम राबविली होती. याच काळात या गावातील दोन देशी दारुचे दुकाने बंद करण्यात आली व तेही कायमचे. मात्र काही वर्षे लोटल्याने गावात अवैध रुपाने देशी, मोहा दारु विक्रीस वेग आला. यात असंख्य पुरुष, ुवक आहारी गेले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तर बरेच स्त्रिया विधवा झाल्या. याचीच प्रचिती घेऊन १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत गावातील स्त्री पुरुषांनी तातडीने दारुबंदीचा निर्णय घेऊन अवैध दारु विक्रेत्यांवर हल्लाबोल केला. याला पोलीस विभागाने सहकार्य केले. बरेच वर्षे गावात दारुविक्री बंद होती. मात्र मधातल्या काळात काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध दारु विक्रीचा व्यवसाय आंधळगावात फोफावला. आज घडीला आंधळगावात दोन बारसह १५ ते २० अवैध दारु विक्रेते आहेत. त्यामुळे गावात जोमात अवैध विक्रीला सुरुवात झाली. मात्र याकडे पोलीस प्रशासन व गावकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. १५ आॅगस्टच्या स्वातंत्र्यदिनी गावात सुरु असलेली अवैध दारुविक्री कायमची बंद करावी, बार गावापासून दोन कि.मी. अंतरावर न्यावे असा ठराव एकमताने मंजूर करून निवेदनावर उपस्थित शेकडो स्त्रियांच्या सह्या घेऊन ठाणेदार के.बी. उईके यांना महिलांनी दिला व दारु अड्यांवर छापे टाकण्यास भाग केले. या छाप्यात आठ लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४ देशी दारुची पेटी, ३७० लिटर मोहाची दारु अशी ४३ हजार रुपयाची दारु जप्त करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र म्हैसकर यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई युवराज चव्हाण, कुंदा उके, नंदेश्वर धुर्वे, राजेश बाभरे, सुभाष हटवार, लोकेश शिंगाडे यांनी दारु विक्रेते नंदा पराते, रिमा नंदनवार, गणेश निमजे, गणेश हेडाऊ, सुकादशी बोकडे, बेबी सोनकुसरे, लक्ष्मी बावणे, कांता बारापात्रे आदींवर मुंबई पोलीस दारुबंदी कायदा ६५ (ई) नुसार गुन्हा नोंद करून कारवाई केली. यात जि.प. सदस्या राणी ढेंगे, सरपंच उषा धार्मिक, उपसरपंच रामरतन खोकले, पं.स. सदस्य उमेश पाटील, किरणबाबा सातपुते, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बुराडे, प्रिती निपाने, वर्षा राघोर्ते, हुरेराबी पठाण, ग्रा.पं. सदस्या कविता बुराडे, निलकमल गोंडाणे, शोभा दु्रगकर, सुनंदा तामसवाडे, रंजना चोपकर, श्याम कांबळे, वंदना बोरकर, राकेश कारेमोरे, काशिराम धार्मिक, धर्मराज सेलोकर, राजेश ठाकरे, राजेश बुराडे, रिना निनावे, महानंदा डेकाटे, गणेश बांडेबुचे, राम कांबळे व गावातील असंख्य महिलांनी सहकार्य केले व नेहमीसाठी आंधळगाव दारुमुक्त करण्याची शपथ घेतली.
आंधळगावात दारुबंदीसाठी ग्रामस्थांचा ‘एल्गार’
By admin | Published: August 19, 2016 12:35 AM