मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आधीच विशाल असलेले वैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असून पावसाळ्यात तीरावरील गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. तालुक्यातील रेंगेपार येथे तर भयावर स्थिती आहे. थोडे-थोडे करत आता वैनगंगेचे पात्र गावाजवळ पोहचत आहे. पावसाळ्यात थडी खचत आहे. हा प्रकार गत २० वर्षांपासून होत असला तरी प्रशासनाला केवळ पावसाळ्यात जाग येते. सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक बंदचा फलक लावते. मात्र प्रभावी उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे रेंगेपार येथे नदी तीरावर अनेक कुटुंब जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत आहे. तुमसर तालुक्यातील रेंगेपार गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. दरवर्षी पाण्याचा प्रवाह गावाच्या दिशेने वेगाने येत आहे. त्यामुळे गावातील मुख्य रस्ता नदीजवळ आला. नदी तीरावर नागरिकांची घरे आहेत. काही नागरिक येथून सुरक्षित स्थळी गेले आहेत. तर काही नागरिकांचे वास्तव्य आजही आहे. त्यांना येथे जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागते. गुलाब कावळे, विनोद मारबते पंचफुला मते, मेश्राम या कुटुंबांचे वास्तव नदी तीरावरील घरात आहे.
अपघातानंतरच प्रशासनाला जाग येईल का?- दरवर्षी पावसाळ्यात प्रशासनाला जाग येते. मात्र जुजबी दुरुस्ती व कारवाई करून सोपस्कार पार पडले जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाने नदी तीरावर धोक्याच्या सूचनेचा फलक लावलेला आहे. फलकावर जड वाहतूक करू नये, अशा सूचना दिल्या आहे. पूरसदृश परिस्थितीत नदी तीरावर भूस्खलन होऊन काठावरील घरे व रस्ता नदीपात्रात समाविष्ट होण्याची भीती येथे कायम आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा शासन व प्रशासनाला निवेदन दिली. आंदोलने केली. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. अपघातानंतरच प्रशासनाला जाग येईल का असा सवाल गावकरी करीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात नदीतीरावरील कुटुंब जीव मुठीत घेवून आहेत.
रेंगेपार येथे वैनगंगा नदीपात्र रस्त्याच्या कडेपर्यंत पोहोचले आहे. परंतु अद्यापही नदी तीरावर काही कुटुंबाचे वास्तव्य आहे. प्रशासनाने दाखल घ्यावी. आतापर्यंत अनेकदा तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदारापासून मंत्र्यांपर्यंत सर्वाना निवेदने दिली. परंतु अद्याप यावर कुणी उपाय योजले नाही.- बन्सीलाल नागपुरे, सरपंच, रेंगेपार.
रेंगेपार येथे पावसाळ्यात अतिशय धोकादायक स्थितीत मार्गक्रमण करावे लागते. गावाच्या दिशेने वैनगंगा नदी झपाट्याने येत आहे. याची माहिती शासन व प्रशासनाला दिली आहे. गावाला बायपास रस्ता नाही. प्रस्ताव पडून आहे. प्रशासनाने उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल. - हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती तुमसर.