अडयाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अडयाळ व परिसरात ज्येष्ठ व ४५ वर्षे वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात करून तब्बल दोन महिने झालीत. याला गावातील ग्रामस्थांचा पाहिजे त्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नव्हता; पण आता हळूहळू का होईना लसीकरणासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. अफवेची हवा गुल झाली आहे.
जेथे लसीकरण मंद आहे, अशा ठिकाणी तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने या विषयावर समुपदेशन करणेही आता गरजेचे झाले आहे; परंतु लोकप्रतिनिधी ज्या वेळी मत मागायला येतात तर मग अशा कठीण समयी का नाही, असाही सवाल उपस्थित केला जात आहे; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपण आपली जबाबदारी व खबरदारी म्हणून लस घ्यायला लसीकरण केंद्रात जायला नको का, असाही प्रश्न दिसत आहे.
अडयाळ ग्रामीण रुग्णालयात दिनांक ६ मेपासून १८ वर्षे वयोगटावरील सर्वांना लसीकरण देणे सुरू झाले आहे. त्यात दर दिवसाला शेकडो युवा मंडळी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घेताना दिसत आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथे कोसो दूरवरून येऊन लस टोचून घेत आहेत. यामुळे आता अडयाळ व परिसरात ज्या लसीविषयी भीतीचे वातावरण, अफवा होती ती यामुळे हळूहळू का होईना कमी होत आहे.
अडयाळ येथे ७ मे रोजी पोलीस तथा महसूल विभागाने कारवाई करून पुन्हा ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे वारंवार सांगूनसुद्धा पालन होत नसेल, तर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक दुकानदार ज्यांना परवानगी आहे व ज्यांना आहेच नाही अशांनी तथा ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटी, शर्ती व नियमानुसार आपले काम करावे. यावेळी तहसीलदार नीलिमा रंगारी तथा ठाणेदार सुशांत पाटील, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, तलाठी इत्यादी उपस्थित होते.