अनिता तेलंग : ग्रामपंचायतीने घेतला पुढाकारअड्याळ : गाव हागणदारीमुक्त कसा होईल. याबाबत प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गाव स्वच्छ व सुंदर जर राहिला तर आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी अनिता तेलंग यांनी व्यक्त केले. महिला व समाजकल्याण तसेच ग्रामस्वच्छता अभियान यासाठी ग्रामपंचायत अड्याळने पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन गुजरी चौक येथे केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी खंड विकास अधिकारी, ठाणेदार अजाबराव नेवारे, सरपंच रजनी धारणे, उपसरपंच देवीदास नगरे, ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी तेलंग यांनी, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सोबत ग्रामस्थांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. आपल्या आरोग्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय व्हावे यासाठी शासनाकडून मदतही मिळत आहे. कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचे असल्यास त्यासाठी घरात शौचालय असणे महत्वाचे. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाने ज्यांच्या घरी जनावरांची संख्या जास्त आहे अशांनी बायोगॅसचा वापर करावा, असे मार्गदर्शन तेलंग यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला होता. (वार्ताहर)
गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा
By admin | Published: February 12, 2017 12:22 AM