पवनी : विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द खरण ज्या गोसीखुर्द गावाजवळ तयार झाले आहे ते गाव परिसरातील गोसे धरणातील पाण्याच्या सिंचनापासून वंचित आहेत. या गावातील शेतकरी मागील तीन वर्षापासून दुष्काळाने पार हवालदिल झाले आहेत. या वर्षीही या परिसरात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे रोवणी झालेली नाही.गोसीखुर्द गाव व परिसरातील गोसे बु., मेंढा, वासेळा, कुर्झा आदी गावातील शेतीला धरणाचे पाणी मिळत नसल्यामुळे सिंचनापासून वंचित झाली आहे. मागच्या वर्षी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गोसीखुर्द धरणाला भेट देण्यासाठी आले असता वंचित राहणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी महाजन यांना मागण्यांचे निवेदन देवून गोसीखुर्द धरणाचे पाणी शेतीला देण्याकरिता चर्चा करण्यात आली. त्याचवेळेस महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. पण अजूनपर्यंत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येथील शेतकरी दुष्काळाशी सामना करीत आहेत. चार पाच वर्षापासून गोसीखुर्द धरणात जलसाठा करण्यात येत आहे. या धरणाचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीला सिंचनासाठी सोडले जात आहे. पण या धरणाचे पाणी परिसरातील गावातील शेतीला पिके जात नाही. मागील तीन वर्षापासून या परिसरात दुष्काय पडत आहे. या वर्षीही या परिसरात समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांच्या धानाला रोवणी झालेल्या नाहीत. येथील शेती ही वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. पण येथे सिंचनाची काहीही सोय नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी या परिसरात दुष्काळाची स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. गोसीखुर्द धरण तयार करण्याकरिता या गावातील शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन कवडीमोल भावाने सरकारला दिली. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे स्वप्न साकार होऊ शकले. (शहर प्रतिनिधी)
गोसेखुर्द परिसरातील गावे सिंचनापासून वंचित
By admin | Published: September 12, 2015 12:35 AM