भंडारा : घरात बाळ येणार याचे जल्लोषात स्वागत होणार होते. मात्र नियतीने असा घात केला की सुखाचे क्षण दुःखात परावर्तित झाले. भंडारा तालुकांतर्गत येणाऱ्या रावणवाडी येथील रहिवासी वंदना मोहन सिडाम यांच्याकडे कन्यारत्न प्राप्त झाले. पहिली मुलगी असली तरी दुसरे अपत्यही त्यांनी अत्यंत आनंदात स्वीकारत त्याचा जल्लोष साजरा करण्याचे ठरविले होते. मात्र शनिवारची पहाट त्यांच्या आनंदावर काळरात्र ठरली. लागलेल्या आगीत वंदनाची सात दिवसाची गोंडस मुलगी जळून ठार झाली. लोकमत प्रतिनिधीजवळ दोन शब्द बोलत तिने आक्रोश हुंदक्यात आसवांना वाट मोकळी करून दिली. ३ जानेवारी रोजी वंदनाने जिल्हा रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. जन्मत:च तिचे वजन कमी असल्याने बालिकेला रुग्णालयातील एसएनसीयू कक्षात हलविण्यात आले होते. हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र अकस्मात असे काही होईल हे कुणीच्याही ध्यानीमनी नव्हते. लागलेल्या भीषण आगीत वंदनाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. वंदना आणि मोहन या दाम्पत्याच्या संसारवेलीवर हे दुसरे मूल होते. त्यांची मोठी मुलगी, आपल्या घरी अजून एक छकुला येणार याची वाट ती आतुरतेने पाहत होती. मात्र या दु:खद प्रसंगाने सर्वांना नि:शब्द करून सोडले.
आनंदावर पडले विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:27 AM