लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्याधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला होता. हा संवाद जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केला तसेच विरोधक यांच्याकडे व्हायरल केला. आमदार कारेमोरे यांची कोणतीही परवानगी न घेता संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल केल्याप्रकरणी मुख्याधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून निलंबित करावे, असे निवेदन तुमसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने (अजित पवार गट) जिल्हाधिकारी यांना, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांना सोमवारी दिले. या प्रकरणात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तुमसर नगरपालिकेच्या मालकीच्या नेहरू मैदानावर जनसन्मान यात्रा व लाडक्या बहिणींशी संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मैदानावर किमान सुविधांबाबत खात्री करण्याकरिता स्वतः पाहणी करून योग्य नियोजन करण्याची जबाबदारी शहरातील प्रशासकीय प्रमुख्याने मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांची होती. मात्र मुख्याधिकारी वैद्य यांनी कार्यक्रमापूर्वीच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याची साधी तसदीही घेतली नाही.
याबाबत भ्रमणध्वनीवर आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्याधिकारी वैद्य यांच्याशी संपर्क साधला. नियोजनाबाबत तुम्ही काय केले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यात मुख्याधिकारी वैद्य यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन कॉल बंद केला. शिष्टमंडळात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, यासीन छवारे, प्रदीप भरनेकर, सुमित मलेवार, सागर गभणे, जाकिर तुरक, गुलराजमल कुंदवानी, तोशल बुरुडे, नानू परमार, प्रवीण भुरे, रिंकू ठाकूर, जयंत पडोळे, वैभव शर्मा, पमा ठाकूर, जयश्री गभने, सरोज भुरे मीना गाढवे, शीला कारेमोरे, मिलिंद गजभिये, संकेत गजभिये, चंदन कामथे, राहुल बघेले, अक्षय गजभिये, एजाज कुरेशी, वसीम शेख, रीना मलेवार, प्रीती गभने, पूनम पाठक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्यथा आंदोलनाचा इशारा आमदाराची परवानगी न घेता संभाषण रेकॉर्ड करून त्या संवादाची क्लिप जाणीवपूर्वक प्रसार माध्यमांवर पाठविली. तसेच ही क्लिप विरोधकांकडे पाठविली, असा आरोप करण्यात ॥ आला आहे. उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम गांभीर्याने न घेणे तसेच संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल करून शहरातील राजकीय वातावरण तापविणाऱ्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करून सेवेतून निलंबित करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.