अर्जुनी - मोरगाव : माय-बाप गमावल्यानंतर त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन धावून आले. २० कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे त्या बालकांना एक वर्षापर्यंत दरमहा दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या रूपात त्यांना विठ्ठलच मिळाले. या मदतीमुळे पुन्हा एकदा जिल्हावासीयांना सहृदयतेचा प्रत्यय आला.
अर्जुनी मोरगाव येथील कोलते दाम्पत्याचा पाच महिन्यांत मृत्यू झाला. ‘लोकमत’ने ‘‘आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला’’ या शीर्षकाखाली शनिवारच्या (दि. ३) अंकात वृत्त प्रकाशित केले. वृत्त वाचून गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांचे मन हेलावले. त्यांनी त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी आवाहन केले अन् मदतीचा ओघ सुरू झाला. मदतीच्या या ओघामुळे जिल्ह्यात सकारात्मकतेचे वारे वाहत असल्याची प्रचिती येत आहे. अर्जुनी मोरगाव येथे अनाथ बनलेल्या मुलांच्या मदतीसाठी सरकारी अधिकारी नाथ बनून धावून आले होते. सालेकसा तालुक्यातील मोहोरे कुटुंबाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी त्या लहान मुलींचे भाऊ बनून धावून आले होते. गोरेगाव तालुक्यातील खडीपार गावामध्ये जेव्हा दोन चिमुकल्या बालिकांनी त्यांचे आई-वडील गमावले आणि ८० वर्षांच्या वृद्ध आजीवर त्या दोन निरागस बालिकांचा सांभाळ करण्याची वेळ आली, तेव्हा जिल्हा प्रशासनातील अधिकारी त्या आजीची मुले बनली आणि त्यांनी मदत केली. रक्ताचा मुलगा गमावलेल्या त्या आईला तब्बल २१ क्लास वन अधिकारी मुले म्हणून मिळालीत.
प्रशासनात माणुसकी जिवंत
प्रशासनामध्ये काम करताना संवेदनशीलता जोपासणे, आपले हृदय कोमल असणे, इतरांचे दुःख पाहून डोळ्यात पाणी येणे या बाबी अतिशय महत्त्वाच्या म्हटल्या पाहिजेत ! गोंदिया जिल्हा प्रशासनामध्ये या बाबींची कुठेही उणीव नाही. गोंदिया जिल्हा प्रशासनामध्ये व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे या प्रसंगातून ठळकपणे दिसून येत आहे.
हे कर्मचारी आले धावून...
‘लोकमत’ने ही व्यथा प्रकाशित केल्यानंतर गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी मदतीकरिता पुढे यावे, असे आवाहन केले आणि या आवाहनाला प्रतिसाद देत किशोर राठोड, राजेश मेनन, आकाश चव्हाण, धोंडिराम कातकडे, पुरवठा विभागाचे हांडे, तलाठी रविकुमार नरेंद्रकुमार गुप्ता, नरेश तागडे, एन. ए. शेख, रवींद्र तितरे, पुंडलिक कुंभरे, शैलेस नंदेश्वर, व्याखाता प्रवीण गेडाम, राज्य उत्पादन शुल्क विभाग देवरीचे दुय्यम निरीक्षक सुहास झांजुर्णे, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे स्वीय सहायक मोहन साठे, मंडल अधिकारी एन. बी. वर्मा, महसूल सहायक मधू दोनोडे, तलाठी श्रीमती ठाकरेले, तलाठी अमित बडोले, नायब तहसीलदार आर. एन. पालांदूरकर व कोतवाल कपिल हारोडे हे कर्मचारी कोलते कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले.