मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी १०० टक्के छायाचित्र असलेली व त्रुटीविरहित मतदार यादी तयार करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे ६१ भंडारा (अ.जा.) विधानसभा मतदार संघांतर्गत भंडारा तालुक्यात येत असलेल्या मतदान केंद्रावरील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या एकूण १३,३१३ मतदारांकडून छायाचित्र (फोटो) जमा करण्यासाठी छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्र, नगर परिषद कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे नागरिकांच्या अवलोकनार्थ जाहीर सूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-बीएलओ (सहा. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, कोटवार, पो.पा. इ.) यांच्यामार्फत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र (फोटो) गोळा करणे सुरू आहे.
ज्या मतदारांचे मतदार यादीत त्यांच्या नावासमोर छायाचित्र नाहीत, अशा मतदारांनी आपले छायाचित्र (फोटो) आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-बीएलओ (सहा. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, कोटवार, पो.पा. इ.) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालय भंडारा येथील निवडणूक विभागात २५ मार्च, २०२१ पर्यंत १५ दिवसाच्या आत जमा करण्याचे आवाहन केले आहे. विहित मुदतीत छायाचित्र (फोटो) जमा न केल्यास सदर मतदार संबंधित मतदान केंद्राचे क्षेत्रात सर्वसामान्यपणे रहिवासी नाहीत, असे गृहित धरून लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम २२ नुसार मतदार यादीमधून सदर मतदारांची नावे वगळणे (कमी) करण्यात येतील. असे सांगण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी आपला मतदार यादीतील तपशील तपासून घेण्यात यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.