भंडारा : संविधान आणि आरक्षणात बदल केला जात असल्याचा खोटा प्रचार करून लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी जागा मिळविल्या. मात्र, ती खोटे बोलून मिळविलेली सूज होती. सूज टिकत नसते. आम्ही या टीकेला ५४७ कोटी रुपयांसारख्या विकासकामांतून उत्तर देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
गोसेखुर्द प्रकल्पावर आधारित जलपर्यटनासह अन्य ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यानिमित्त भंडारा येथील रेल्वे मैदानावर आयोजित जाहीर सभेत त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही जनतेला दिली. व्यासपीठावर आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, संस्थाचालक किरण पांडव यांच्यासह शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, उबाठा आणि आम्ही राज्यात समोरासमोर १३ ठिकाणी जागा लढविल्या. त्यातील ७ आम्ही जिंकल्या. टक्केवारीत दोन लाख मते अधिक घेतली.हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारे आहे. दीक्षाभूमी, इंदू मील स्मारकाच्या विकासाला दिशा दिली. लंडनमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराला स्मारकाचा दर्जा दिला. पंतप्रधान मोंदींनी शपथ घेताना संविधान डोक्याला लावले. मात्र, संविधानाबद्दलचा अपप्रचार खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते म्हणाले, या बाबतीत ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आजही त्या मतावर ठाम आहे. ओबीसींच्या योजनांवर निधी वाढविण्याचे काम करू.३ एप्रिलची सुटीपरमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक बाबा जुमदेव यांना मानणारा मोठा वर्ग पूर्व विदर्भात आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांत त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी आमदार भोंडेकर यांनी भाषणातून केली होती. तो धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी या दिवशी सुटी जाहीर करण्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
पर्यटनातून चालना मिळेलसभास्थळी येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वैनगंगा नदीच्या काठावरील कारधा परिसरात गोसेखुर्द प्रकल्पावरील जलपर्यटन स्थळाचे भूमिपूजन झाले. यावेळी त्यांनी नौकाविहाराचा आनंदही लुटला. सभेतील भाषणात ते म्हणाले, हे जलपर्यटन या जिल्ह्यासाठी विकासाचे नवे दालन ठरणार आहे. त्यातून पर्यटन, रोजगाराच्या मोठ्या संधी येथे येणार आहेत. आज या प्रकल्पाचे उद्घाटन करताना वैनगंगेचा तीर पाहून आपण भारतात नाही तर विदेशातच असल्याचे भासत होते, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.