भंडारा : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मध्य प्रदेशसह गोंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगेला पूर आला आहे. या पुरात जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, २०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील एका राज्य मार्गासह ८१ रस्त्यांवरील वाहतूक पुरामुळे बंद पडली आहे.
पुराचा सर्वाधिक फटका भंडारा शहराला बसला असून, शहरातील ग्रामसेवक कॉलनी, नागपूर नाका परिसर, भोजापूर, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत १७५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते, तर मंगळवार दुपारपर्यंत हा आकडा २१०च्या वर पोहोचला. शोध व बचाव कार्यासाठी एसडीआरएफचे पथकही शहरात दाखल झाले असून, त्यांनी कार्याला प्रारंभ केला आहे.
पूरबाधितांना राहण्यासाठी व जेवणाची सोय करण्यात आली आहे. हवामान खात्यामार्फत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला नसला तरी वैनगंगेच्या कोपामुळे जनजीवन प्रभावित झाले असून, शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धान पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मोहाडी शहरासह तालुक्यात वैनगंगा व सूर नदीचे पाणी गावांत शिरले. लाखांदूर तालुक्यातही पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. पवनी तालुक्यातही तशीच स्थिती आहे.
नालाच्या पुरात वाहून गेला इसमतुमसर तालुक्यातील सिलेगाव ते वाहणी नाल्यावर पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीने पूल ओलांडण्याऱ्यांपैकी एक जण वाहून गेला. शामा सांगोडे असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव नाव आहे. तर त्याचा सहकारी विशाल गजभिये याला वाचविण्यात यश आले. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सिलेगाव ते वाहनी नाल्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. यात विशाल गजभिये व श्यामा सांगोळे दोन्ही रा. तिरोडा हे दुचाकी क्रमांक एम.एच. ३६ -९९५७ ने जात होते. त्यावेळी तिथे उपस्थित होमगार्ड जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे न ऐकता दुचाकी नाल्यावरून काढण्याचा प्रयत्न करू लागले. याचवेळी घसरून दोघेजण पुराच्या पाण्यात कोसळले. होमगार्ड ओरडत व उपस्थित ग्रामस्थ ही मदतीला धावले. यापैकी विशाल गजभियेला वाचविण्यात यश आले. तर दुसरा श्यामा सांगोळे हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. सिहोरा पोलीस व त्यांची चमू वाहून गेलेला इसमाचा शोध घेत आहेत.