भंडारा : वैनगंगा नदीची शहरालगतच्या कारधा पुलावरून मोजल्या जाणाऱ्या पातळीने धोक्याचा इशारा दिला असून पूर परिस्थितीची शक्यता वाढली आहे. या जलस्तराची इशारा पातळी २४५.०० मीटर असून धोक्याची पातळी २४५.५० मीटर आहे. रात्री नऊ वाजता ही पातळी २४५ मिटर नोंदविण्यात आली असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
कारधा नदीवरून मोजली जाणारी वैनगंगेची पातळी म्हणजे गोसेखुर्द जलाशयाची पातळी समजली जाते. मागील २४ तासापासून जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने नदीच्या जलस्तरात वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात शुक्रवारी रात्री पहिल्यांदाच वैनगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे, हे विशेष. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचायला फक्त अर्धा मीटर जलस्तर बाकी आहे.
गोसेखुर्दचे ३३ गेट सुरूगोसेखुर्द प्रकल्पाचे एकूण ३३ गेट असून ते सर्वच आज सायंकाळपासून सुरू करण्यात आले आहे. यातीन जल पातळीवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असला तरी, नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये झालेल्या पावसामुळे वैनगंगेची पातळी वाढतच आहे.
संजय सरोवरचे पाच गेट सुरूवैनगंगेमध्ये संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी येते. मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे संजय सरोवर प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगेची पातळी वाढतच आहे.संजय सरोवर प्रकल्पासह पुजारी टोला प्रकल्प, बावनथडी प्रकल्प, धापेवाडा प्रकल्पाचे पाणी गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. सध्या संजय सरोवरचे पाच गेट आणि धापेवाडाच्या विसर्गचे पाणी येथे जमा होत आहे.
जनतेला सावधगिरीचा ईशारावैनगंगा नदीने ईशारा पातळी गाठली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरीचा ईशारा देण्यात आला आहे. सखल भागात नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची जमू आणि महसूल विभागाचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.