तुमसर: तालुका मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर माडगी येथील वैनगंगा नदीपात्र रेती तस्करांनी अक्षरश: पोखरून टाकले आहे. उत्खनन केलेल्या रेतीचा स्मशानघाट परिसर व गावाच्या प्रवेशद्वाराजवळच साठा केला आहे. पोखरलेल्या नदीपात्रामुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. तस्करांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
माडगी गावाशेजारी वैनगंगा नदी पात्र आहे. येथील नदी पात्र विस्तीर्ण असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेती होती; परंतु ही रेती तस्करांनी उत्खनन केली. सदर रेती घाटाचा महसूल शासनाने लिलाव केला नाही. त्यानंतरही रेती तस्करांनी नदीपात्रातून रेतीचा प्रचंड उपसा केला. त्यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. सध्या नदीपात्रात रेती शिल्लक उरली नाही.
माडगी येथे नदीपात्रात गावाचे अंतर केवळ ५० ते ६० मीटर आहे. प्रचंड रेती उपशामुळे पुराचे पाणी नदीकाठावरील गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी पुरात नदीकाठावरील घरात पाणी शिरले होते. शास्त्रीयदृष्ट्या रेती ही पुराचे पाणी थोपविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नदीपात्रातून रेती तस्कर रेतीचा उपसा करताना महसूल प्रशासनाला दिसले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो. माडगी या गावात तलाठी कार्यालय आहे त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेतीचा उपसा करताना महसूल प्रशासनाची परवानगी घेतली होती काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, घाट लिलाव नसताना राजरोस रेतीचा उपसा कसा केला, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक स्तरावर रेती उपसा करण्याची परवानगी येथे दिली गेली होती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. रेतीचा उपसा करताना महसूल प्रशासनाची परवानगी घेतली होती काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, घाट लिलाव नसताना राजरोस रेतीचा उपसा कसा केला, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक स्तरावर रेती उपसा करण्याची परवानगी येथे दिली गेली होती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
बॉक्स
पर्यावरणाला धोका
माडगी येथील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केल्यामुळे नदीपात्रात रेती नामशेष झाली आहे. सध्या नदीपात्रात तळातील माती दिसत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. स्मशान शेडजवळ रेती साठा करून ठेवला आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरही रेती साठा आहे. रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.