तुमसर तालुक्यातील चारगाव, ढोरवाडा, माडगी शिवारात बावनथडी लघु कालवा सिंचन प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांची शेती संपादित केली. त्यासंबंधी शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. चारगाव येथील शेतकरी सुधीर वैद्य यांची ५१ आर शेती संपादित केली. याप्रकरणी वैद्य यांनी तुमसर येथील प्रकल्प कार्यालयात अनेकदा भेट दिली. कार्यालयातील अधिकारी तुमची फाईल भंडारा येथे गेल्याची माहिती देऊन मोकळे होतात. याप्रकरणी वैद्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. वारंवार तुमसर व भंडारा येथे जाणे त्यांना परवडणारे नाही.
सध्या बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आला असून, शेतकऱ्यांना पाण्याचे वितरण सुरू झाले. परंतु शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. सदर शेतकऱ्यांना शेतीच्या मोबदला मिळाला नाही तर उपोषणाचा इशारा अन्यायग्रस्त शेतकरी सुधीर वैद्य यांनी दिला आहे.