लाखनी : तालुक्यातील मासलमेटा येथे लघुपाटबंधारे विभागाद्वारे उलट्या तलावाचे नहराचे काम २२ एप्रिल १९९८ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आले. १८ वर्षाच्या कालावधी लोटल्यानंतरही ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. त्या शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक मोबदला देण्यात आला नसल्याचा आरोप उपसरपंच डॉ. रामनाथ पारधीकर यांनी केले.मासलमेटा येथील ४० शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित केल्या आहेत. संपादित केलेल्या जमिनीची प्रकरणे भुसंपादन विभागाला दिलेली आहेत. यावर शासनाने स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्यात यावे, शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावा यासाठी २६ डिसेंबर २०१४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरपंच शालिनी रामटेके, उपसरपंच रामनाथ पारधीकर व ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी केली.२४ डिसेंबर २०१३ ला खासदार प्रफुल पटेल यांना निवेदन दिले आहे. लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांची समस्या सुटली नाही. भुसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ४० शेतकऱ्यांची प्रकरणांना स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा डॉ. रामनाथ पारधीकर यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
१८ वर्षांपासून शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा
By admin | Published: January 30, 2016 12:56 AM