साकोली : परप्रांतातून स्वस्त तांदूळ विकत घेऊन तो शासनाला अधिक दरात विकण्याच्या प्रकरणाचा भंडाफोड साकोलीजवळ झालेल्या वाटमारीने झाला. आता पोलीस तांदूळ तस्करीच्या दिशेने तपास करीत असून पोलिसांना आयकर, विक्रीकर आणि जीएसटी विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. एवढेच नाही तर तांदूळ खरेदी आणि विक्री करणाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
साकोली तालुक्यातील पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर तीन दिवसांपूर्वी २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी झाली होती. तेलंगणामधील रमेश अण्णाचा दिवाणजी माशेट्टी भास्कर याला लुटण्यात आले होते. तो तांदळाच्या पैशाच्या वसुलीसाठी आला होता. वाटमारी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट तांदूळ तस्करीपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी आठ लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, आता तांदूळ तस्करीच्या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करीत आहेत.
दोन राईस मिलमालकांनी खरेदी केलेला तांदूळ हा कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केला आहे काय? की बेकायदेशीर खरेदी केला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस विभागाने जिल्हाधिकारी, आयकर, विक्रीकर तसेच जीएसटी विभागाला पत्र देऊन संबंधित दोन्ही राईस मिलमालकांनी खरेदी केलेल्या तांदळाची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे पत्र दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या विभागाकडून पत्र आल्यानंतर हे प्रकरण कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी भास्कर याच्या सांगण्यानुसार गोंदियातून पाच लाख व पळसगाव येथील राईस मिल चालकाकडून १८ लाख ५० हजार रुपये घेतले होते. ही नोंद पोलीस ठाण्यातही करण्यात आली. पोलिसांनी आता या दोन राईस मील चालकांसोबतच तेलंगाणातील रमेश अण्णालाही चौकशीसाठी बोलविण्याची तयारी सुरु केली आहे.
बाॅक्स
इतरांचीही होणार चौकशी
वाटमारी प्रकरणानंतर परप्रांतातील तांदळाची तस्करी होते हे उघड झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पुरवठा विभागही खळबळून जागा झाला. हा प्रकार इतरही व्यापारी करीत असल्याचा संशय आहे. त्यामुळे इतरांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
लाभार्थींकडून केली जाते तांदूळ खरेदी
स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थींना अत्यल्प दरात तांदूळ दिला जातो. हा तांदूळ लाभार्थी दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्यांना विकतात. हाच तांदूळ व्यापारी राईस मिलमध्ये पाॅलिश करून शासनाला २४ रुपये किलोप्रमाणे विक्री करतात, असे अनेक व्यापारी जिल्ह्यात आहेत.
बाॅक्स
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वाटमारी होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटला. तांदूळ तस्करीचे प्रकरण पुढे आले. ‘लोकमत’ने याबाबत वृत्तही प्रकाशित केले. पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली. परंतु, जिल्हा पुरवठा विभागाला अद्यापही जाग आली नसल्याचे दिसत आहे. संबंधित ठिकाणी जाऊन साधी चौकशीही केली नाही.