तुमसर तालुक्यातील करकापूर ते सिलेगाव हा रस्ता स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु त्यांचे दुर्लक्ष होत आहे. रेंगेपार येथील बायपास रस्त्याचा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना येथून मार्गक्रमण करावे लागते. प्रशासन दुर्घटनेची प्रतीक्षा करीत आहे काय, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ३० ऑगस्ट रोजी तुमसर बपेरा राज्यमार्गावर हरदोली येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, बालकदास ठवकर, प्रफुल वराडे, अभय राजन मिश्रा, मुकुंद आगाशे, सुनील पटले यांनी उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.