लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळी गावी परतताना बसची तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. शहरातील खांबतलाव चौक, शास्त्री चौकात शेकडो विद्यार्थी अंधार पडल्यानंतरही बसची प्रतीक्षा करीत असतात. यात विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. या विरोधात युवा सेनेच्या वतीने गुरुवारी एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना घेराव घालण्यात आला.भंडारा शहरातील विविध शाळांमध्ये बाहेरगावातील शेकडो विद्यार्थी दररोज येतात. एसटी महामंडळाची पास काढून हे विद्यार्थी शाळेत पोहचतात. परंतु बस वेळेवर येत नसल्याने या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सायंकाळच्या वेळी पाच वाजतापासून सात वाजेपर्यंत बस न आल्याने बुधवारी शेकडो विद्यार्थी खांबतलाव चौक आणि शास्त्री चौकात बसची प्रतीक्षा करीत होते. आलेल्या बसमध्ये जागा नसल्याने वाहक त्यांना आतमध्येही येवू देत नव्हते. पाच वाजतापासून तब्बल दोन तास हे विद्यार्थी या ठिकाणी उभे होते. दररोजचा हा प्रकार असून विद्यार्थी उशिरा घरी जात आहेत. त्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हा प्रकार लक्षात येताच युवा सेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे यांनी तेथे धाव घेतली. या विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली. परंतु दररोज हा प्रकार होत असल्याने गुरुवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात धडक दिली. त्या ठिकाणी विभागीय नियंत्रक भालेराव यांना हा प्रकार सांगितला. तसेच विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी वेळेत बसची व्यवस्था करावी, प्रत्येक थांब्यावर कर्मचाºयांची नियुक्ती करावी, बसमध्ये चढतांना शालेय विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दयावे आदी मागण्या करण्यात आल्या. विभागीय नियंत्रकांनी या संदर्भात आदेश देणार असल्याचे सांगितले.यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, अजीत आस्वले, प्रणय बन्सोड, रोशन काटेखाये, रंगनाथ खराबे, स्वप्नील नशिने, प्रवण हेडाऊ, विजय यादव, कुलदिप सिंग, हर्षल धांडे उपस्थित होते.शाळेच्या आवारात बसची मागणीशिक्षणासाठी बाहेरगावाहून येणाºया विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात बसची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ३०पेक्षा अधीक विद्यार्थी असलेल्या शाळेच्या आवारात बस उपलब्ध करुन द्या, असे मुकेश थोटे यांनी विभागिय नियंत्रकांना सांगितले. त्यावरुन संबंधित प्राचार्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेवू असे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांची बससाठी तासन्तास प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:28 AM
बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळी गावी परतताना बसची तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. शहरातील खांबतलाव चौक, शास्त्री चौकात शेकडो विद्यार्थी अंधार पडल्यानंतरही बसची प्रतीक्षा करीत असतात.
ठळक मुद्देसायंकाळी वेळेवर बस नाही : युवा सेनेचा एसटी विभागीय नियंत्रकांना घेराव