सिल्ली आंबाडी : येथील विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागो ग्राहक जागो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सुरक्षा विभागांतर्गत भंडारा येथे आयोजित एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केलेल्या आवाहनानुसार ग्राहक चळवळ ग्रामीण स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच ही चळवळ लोकचळवळ होण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांना या चळवळीत सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे या आवाहनानुसार प्रेरित होऊन विविध शासकीय योजनांचे प्रसारक व प्रचारक कार्तिक मेश्राम यांनी विनोद विद्यालय सिल्ली येथे जागो ग्राहक जागो यावर आधारीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य अनमोल देशपांडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य शत्रुघ्न भांडारकर, पर्यवेक्षिका एम.टी. मस्के आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान कार्तिक मेश्राम यांनी ग्राहकांची फसवणूक कशाप्रकारे केली जाते. त्याची विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना आपली जागरुकता आपले हित यावर मौलिक मार्गदर्शन केले. कार्तिक मेश्राम यांनी होलमार्क, एगमार्क, आय.एस.एस. मार्क आदी चिन्हांचे सांकेतिक महत्त्व अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले. या कायद्याची अंमलबजावणी २४ डिसेंबर १९८६ पासून झाली असून या कायद्याने अन्यायग्रस्त ग्राहकांना तीन महिन्याच्या कालावधीत न्याय मिळवून दिला जातो, अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. त्यानंतर प्राचार्य अनमोल देशपांडे तसेच उपप्राचार्य भांडारकर यांनी काही शंका व प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांना त्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. (वार्ताहर)
जागो ग्राहक जागो अभियान
By admin | Published: December 31, 2014 11:20 PM