लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भात उत्पादक पट्ट्यात धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते. सर्वांची नजर रोजगार हमी योजनेच्या कामावर असते. मात्र जिल्ह्यात पुरेशी कामे सुरु नसल्याने मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागते. गावखेड्यातील शेकडो मजूर शहराकडे धाव घेत असल्याचे सध्या दिसत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात २ लाख १० हजार ५६७ कुटुंबांनी रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना त्यांच्याच गावाजवळ काम उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध असतो. परंतु मंजूर झालेली कामेही केली जात नाही. तर काही कामे थेट मशिनच्या सहाय्याने करून मजुरांच्या हातचे काम हिरावून घेतले जाते. त्यामुळे धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते.भंडारा जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे रबी आणि उन्हाळी पीक क्षेत्र घटले. परिणामी मजुरांना मजुरी उपलब्ध होत नाही. अनेक मजूर आता शहराकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेचे काम सुरु झाले तर या मजुरांना कामे मिळू शकतात. हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार तरुण नागपूर, मुंबई, पुणे, रायपूर आदी शहरांकडे धाव घेत आहेत. कोणत्याही खेड्यात सध्या गेल्यास तेथील तरुण वर्ग कामाच्या शोधात बाहेर असल्याचेच दिसून येते. एकीकडे रोजगार हमी योजनेच्या कामाचा डांगोरा पिटायचा आणि दुसरीकडे मजुरांना काम द्यायचे नाही, अशी अवस्था दिसून येते. प्रशासनानेच लक्ष देणे गरजेचे आहे.गांधी चौकात वाढली गर्दीभंडारा शहरातील गांधी चौकात सकाळी मजूर काम मिळेल या आशेने एकत्र येतात. या ठिकाणी विविध ठेकेदार आणि ज्यांना मजुरांची गरज आहे ती मंडळी येतात. हंगामात येथे मजुरांची संख्या कमी दिसायची. परंतु गत काही दिवसांपासून गांधी चौकात मजुरांची गर्दी वाढल्याचे दिसून येते. यात मोठ्या प्रमाणात महिलाही असतात. अनेक मजुरांना दुपारी २ वाजेपर्यंत ताटकळत राहूनही काम मिळत नसल्याने निराश होऊन गावी जावे लागते.
ग्रामीण भागात मजुरांची कामासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:31 PM
भात उत्पादक पट्ट्यात धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते. सर्वांची नजर रोजगार हमी योजनेच्या कामावर असते. मात्र जिल्ह्यात पुरेशी कामे सुरु नसल्याने मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागते. गावखेड्यातील शेकडो मजूर शहराकडे धाव घेत असल्याचे सध्या दिसत आहे.
ठळक मुद्देरोहयो अपयशी : धान काढणीनंतर शेतमजुरी ठप्प, तरुणांची धाव महानगराकडे