मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जगप्रसिद्ध दोन मॅग्निज खाणी असलेल्या तुमसर तालुक्यातील बेरोजगारांना येथे रोजगार मिळत नाही. उलट खाणींमध्ये परप्रांतीय कामगारांचाच भरणा केला जातो. त्यामुळे त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी भटकंती करावी लागते. अनेक तरुणांनी कामाच्या शोधात महानगर गाठले आहे, तर स्थानिक कंत्राटी कामगारांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. चिखला व डोंगरी बु. येथे जगप्रसिद्ध मॅग्निज खाण असून, तुमसर तालुक्यात बेरोजगारांची संख्या मात्रमोठी आहे. खाणीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही अशी ओरड कायम असते. दोन्ही मॅग्निज खाणीत सुमारे दोन हजार कामगार कंत्राटी पद्धतीने कामे करीत आहेत. खाणीच्या डोलारा कंत्राटी कामगारांवर अधिक आहे. नियमित कामगारांची येथे संख्या कमी असून, काही कंत्राटी कामगार स्थानिक आहेत. स्थानिक नियमित कामगारांची संख्या नगण्य आहे.मॅग्निज खाणीत परप्रांतीयांचा भरणा अधिक असल्याची ओरड आहे. कामगारांची भरती वरिष्ठ स्तरावरून होते असे सांगण्यात येते त्यामुळे येथील स्थानिक अधिकारी काहीच करू शकत नाही. परंतु नियमानुसार स्थानिकांना येथे मॅग्निज खाणीत सामावून घेण्याची गरज आहे. अनेकदा यासाठी स्थानिकांनी आवाज उठविला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नियमानुसार भरती करण्यात येते तसेच मॉयल प्रशासनाकडून सांगण्यात येते. तुमसर तालुक्यात अनेक उच्चशिक्षित विद्यार्थी आहेत. मात्र स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी नसल्याने त्यांना महानगर गाठावे लागते. तर आयटीआय सारखे प्रशिक्षण घेऊनही अनेक तरुण लघु व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. नोकरीची आशा नसल्याने निराश झालेले तरुण तुमसर तालुक्यात ठिकठिकाणी दिसतात. काही तर नशेच्या आहारीही गेल्याचे दिसून येते. मात्र त्यांना रोजगार दिला जात नाही.
मॅग्निज साठा आणखी १०० वर्षे पुरेल एवढा - डोंगरी व चिखला येथील खाणीत पुन्हा शंभर वर्षे पुरेल एवढा मॅग्निज साठा भूगर्भात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येथे स्थानिक बेरोजगारांना सामावून घेण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. स्थानिक बेरोजगारांना येथे रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यात असंतोष आहे. मॅग्निज खाणीत भरतीप्रक्रिया करताना स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे.खान परिसराचा विकास ‘शून्य’- डोंगरी व चिखला ही गावे जगप्रसिद्ध मॅग्निज खाणीमुळे झाली. परंतु या दोन्ही गावांचा विकास मात्र शून्य आहे. वर्षानुवर्षे ही गावे जशी होती तशीच आहेत. दुसरीकडे खान प्रशासन सीएसआर निधी देतो, परंतु स्थानिक गावात मात्र उल्लेखनीय असे कोणतेही कार्य अजूनपर्यंत झालेले नाही. तालुका बाहेरील शहराला व गावांना सीएसआर निधी देण्यात येतो. हे विशेष.