साकोली येथील तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत गडकुंडली रोड येथे स्थानांतरित होऊन दीड-दोन वर्षाचा कालावधी झाला. तरीही तहसील कार्यालयाचे सेतू केंद्र मात्र जुन्याच तहसील कार्यालयात आहे. यात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी पंधरा-वीस मिनिट ही जर पाऊस आला तर सेतू केंद्र परिसरात एखाद्या बोडीचे स्वरूप प्राप्त होते. सध्या पावसाळा सुरू आहे. गत तीन चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे सेतू केंद्रात दररोज बोडीसारखे स्वरूप दिसून येते. येथे शासकीय दस्तावेज सत्यापण, एपीडेबिट, इनकम सर्टिफिकेट, डोमिसाईल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व शासकीय कामानिमित्त लागणारे बरेच प्रमाणपत्र सेतू केंद्रामध्ये तयार केले जातात. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेशासंदर्भात लागणारे सर्व दस्तावेज याच कार्यालयात नोंदणीकृत होत असल्यामुळे या नोंदणी केंद्रात येणारे विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिक यांना महामार्गापासून पाण्यातून मार्ग काढत सेतू केंद्रापर्यंत पोहोचावे लागते. बरेचदा चिखल असल्याने यापूर्वी पाण्यात पाय घसरून बरेच लोक पडलेले आहेत. त्यामुळे हे सेतू केंद्र नवीन इमारतीतच स्थानांतरित करण्याची मागणी विद्यार्थी संघटना व नागरिकांनी केली आहे.
साकोलीच्या सेतू केंद्रात पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:43 AM