रंजित चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशयाचे पाणी वाटपाचे नियोजन गडगडल्याने पाण्याचा अपव्यय सुरू झाला आहे. डावा कालवाअंतर्गत असणाऱ्या बेदखल गावांचे शिवारात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे भुवया उंचावल्या आहेत. धानाचे लागवडीसाठी पाणी दिले नाही; परंतु पाण्याचा खुलेआम अपव्यय होत असताना पाटबंधारे विभागाची यंत्रणा निद्रिस्त असल्याचे आरोप शेतकरी करीत आहेत. दरम्यान खरिपाचे नर्सरी पेरणीत दिल्या जाणाऱ्या पाणी वाटपात अडचणी येणार आहेत.
सिहोरा परिसरात डावा कालवाअंतर्गत गावांचे शेतशिवारात उन्हाळी धान पिकांना चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत आहे. गावांना पाणी वाटपाचे नियोजन करताना अनेक गावांचे शेतशिवाराला डच्चू देण्यात आले आहे. देवरी देव, सुकली नकुल, गोंडीटोला, बपेरा गावांचे शेतशिवार वगळण्यात आले होते. वाढीव हेक्टर आर क्षेत्रात पाणीपुरवठा होणार नाही. असे कारण पुढे करीत या गावांचे शेत वगळण्यात आले होते. शेतकरी पाणी वितरण व करारबद्ध करण्याची ओरड करीत होते; परंतु पाटबंधारे विभागाचे यंत्रणेने ऐकले नाही. परंतु झाले उलटेच पाणी वाटपातून वगळण्यात आलेल्या गावातच चांदपूर जलाशयाचे पाणी शिरले आहे. नाले ओवरफ्लो होऊन वाहत आहेत. शेतीत धानाचे लागवडीसाठी पाणी मिळाले नाही; परंतु पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत असल्याने शेतकऱ्यांत संताप निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागाचे यंत्रणेचे नियोजन गडगडल्याने पाणी नाले आणि नदीला वाहून जात आहे.
चांदपूर जलाशयाचे पाणी खरेदी केलेले आहे. खरीप हंगामात धानाचे नर्सरी लागवडीसाठी पाणी वितरणाची परंपरा या परिसरात जोपासली जात आहे; परंतु जलाशयाचे पाणी विनाकारण वाहून जात असल्याने खरीप हंगामात पाणी वितरण करताना अडचणी येणार आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी चिकारमधून वितरण करण्यात येत आहे. या चिकारचे गेट नादुरुस्त असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाशित केले आहे. चिकरचे गेट आता बंदच होत नसल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नियोजनात नसताना कालवाअंतर्गत पाणी सोडण्यात आले आहे. चांदपूर जलाशयाचे पाणी वितरण करणारे कालवे, नहर, पडचाऱ्या जीर्ण झाले आहेत. आऊटलेटची कामे शिल्लक आहेत. पाटबंधारे विभाग मनुष्यबळ नसल्याचे तुणतुणे हलवीत आहे. शेतकरी गोंधळात अडकला आहे. करारबद्ध शेती करून पाणी मागण्याची तयारी करीत असताना पाणी दिले जात नाही. वातानुकूलित खोलीत बसून अधिकारी नियोजन करीत असल्याने सिहोरा परिसरातील शेती अधिक प्रमाणात ओलिताखाली आणली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे परिसरात शेतकरी सुजलाम सुफलाम झाले नाहीत. चांदपूर जलाशयाचे पाणी महागडे असताना पाण्याचा अपव्यय यंत्रणा करीत आहे. खाकेत कळसा अन् गावाला वळसा अशी अवस्था झाली आहे. चांदपूर जलाशय आणि नहर, कालवे, चिकार दुरुस्तीवरून कुणी छातीठोकपणे बोलायलाच तयार नाही. यामुळे समस्या ‘जैसे थे’ आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी उपविभागीय अभियंता किशोर बाभरे यांना संपर्क साधले असता होऊ शकले नाही.
बॉक्स
चिकारची नादुरुस्ती भीतीदायक
चांदपूर जलाशयाचे वाणी विसर्ग करण्यासाठी चिकारचे बांधकाम धरणावर करण्यात आले आहे. या चिकारला एक गेट लावण्यात आले आहे. चिकारमधून विसर्ग होणाऱ्या पाण्याची साठवणूक टाकीत करण्यात येत आहे. या टाकीला उजवा आणि डावा कालव्याचे मुख्य गेट आहेत. टाकीतील पाण्याचा विसर्ग कालव्यात करण्यात येत आहे. चिकारमधून पाण्याचा विसर्ग करताना हादरे बसत असल्याचा अनुभव कर्मचारी घेत आहेत. चिकारचे गेट उघडल्यानंतर जिवांचे आकांताने कर्मचारी पळापळ करताना दिसून येत आहेत. चिकारची दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची ओरड नवीन नाही; परंतु कुणी मनावर घेत नाही. चिकार धोकादायक असल्याची माहिती वरिष्ठांना आहे. लोकप्रतिनिधी बोंबलत नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी तिजोरी उघडण्यात येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. चांदपूर जलाशयाचे पाणी वितरणात गडबड होत असल्याचे चित्र आहे.