जलजागृती बैठक : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ, राजेंद्र निंबाळकर यांचे प्रतिपादनभंडारा : ग्रामस्तरावर योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे वैयक्तिक, सार्वजनिक स्तरावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे नासाडी होणाऱ्या पाण्याचे वेळीच व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता ग्रामस्तरावर लोकसहभागातून जल समृद्धी व्हावे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले. जागतिक जलदिनानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते.बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामदास धांडे, उप अभियंता शरद रोडे, शाखा अभियंता अरुण पोहाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी लठ्ठे, कार्यकारी अभियंता एम.बी. मैदमवार, खंडविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर म्हणाले, नळ पाणी पुरवठा योजनांच्या वितरण व्यवस्थेमधील दोष वेळीच दूर करण्यात आले तर लिंकेजेसमुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय होणार नाही. योजानंच्या गावामध्ये नळ धारकांकडे वॉटरमिटर लावण्यात आले तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करता येईल, यामुळे नळ धारकांची पाण्यासोबतच पैशाची बचत होईल. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळ घाण पसरणार नाही याची काळजी घेण्यासोबतच पाण्याचे महत्व, पाण्याची गुणवत्ता, जल पुन:र्भरण आदी उपाययोजना या फक्त मर्यादित काळासाठी नाही तर नियमितपणे लोकसहभागातून करायला हव्यात. यासाठी ग्रामस्तरावर पाणी व स्वच्छतेच्या प्रबोधनाचे कार्य अधिकारी, कर्मचारी यांचे नेतृत्वात करण्याचे आवाहन केले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भोर यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता, गुणवत्ता, पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती, पाणी व स्वच्छतेच्या कार्यात लोकसहभाग, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण व संनियंत्रण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी लोकसहभागातून कार्य करण्याचे आवाहन केले. उपअभियंता रोडे, मैदमवार, लठ्ठे यांनी पाणी व स्वच्छतेच्या कामाला बळकट करणे, ग्रामस्तरावर डासमुक्त गाव करण्यासाठी मॅजीक पिट शोषखड्डयांचे बांधकाम करण्याबाबत समायोचित मार्गदर्शन केले. धांडे यांनी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या जलजागृती सप्ताहादरम्यान, पाणी गुणवत्ता पॉकीट चार्टचे वितरण व मार्गदर्शन, घरगुती, सार्वजनिक पाणी वापराबाबत बचतीचे उपाय, पाण्याचे साठवण व संकलन वितरण व्यवस्थेमधील पाणी नाश टाळण्याचे उपाय व मार्गदर्शन, विशेष उपक्रमांची प्रचार प्रसिद्धी करणे आदीसह नाविण्यउपक्रम राबविण्याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले.यानंतर सप्ताहादरम्यान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या वॉटरमिटर, पाणी गुणवत्ता घडीपत्रिका पाणी गुणवत्ता पॉकीट चार्ट, सप्ताहाकरिता तयार करण्यात आलेल्या लोकसहभागातून जल समृद्धीकडे या लोगोचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
लोकसहभागातून ग्रामस्तरावर जलसमृद्धी व्हावी
By admin | Published: March 26, 2016 12:30 AM