प्रशांत देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारे महिलांचे तंटे आता लाखनी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लावलेल्या ‘वॉटर मीटर’मुळे बंद झाले आहेत. परिणामी पाणीपट्टी कराची आकारणीही निम्म्यावर आली आहे. यामुळे पाणी, विजेची बचत झाली आहे. सर्वांना समप्रमाणात पाण्याचे वितरण होत असल्याने १५ गावांचे ‘वॉटर मीटर’ दिशादर्शक ठरला आहे.लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना शाश्वत व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे आहे. एकीकडे नगर पालिका हद्दीतील नळांना करण्यात आलेले ‘वॉटर मीटर’ व त्यातून होणारे पाण्याचे वितरण हे अनेक ठिकाणी बंद पडले आहे. अशावेळी ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ‘वॉटर मीटर’च्या पुढाकारातून गावात नवचैतन्य येऊन नागरिकांसाठी ही सुविधा निर्माण झाली आहे. १४ व्या वित्त आयोगातून या ‘वॉटर मीटर’ची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात सात तालुके असताना हा प्रयोग केवळ लाखनी तालुक्यात यशस्वी झाला आहे. तो जिल्ह्यासह राज्यातील पालिकांसाठी आदर्शवत ठरणारा आहे.१५ ग्रामपंचायतींमधील ३ हजार १३९ कुटुंबांनी वॉटरमीटर लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य ग्रामपंचायतींमध्ये पाण्याच्या अन्य प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. शिवनी ग्रामपंचायत ही सर्व नळधारकांना वॉटर मीटर लावणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.शासनाच्या धोरणानुसार दरदिवशी प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर याप्रमाणे पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी प्रति युनिट सात रूपये आकारणी केली जाते. त्यामुळे एका कुटुंबाला महिन्याला ४२ रूपये पाणीपट्टी कर आकारण्यात येत आहे. ही आकारणी पाण्याच्या वापरावर अवलंबून आहे. पूर्वी वॉटर मीटर नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याने गावातील पाण्याची टाकी ३५ मिनिटात रिकामी होत होती. आता ती रिकामी होण्याला ७५ मिनिटांचा अवधी लागतो.सालेभाट्यात सार्वजनिक नळांना ‘वॉटर मीटर’सालेभाटा येथे ११ सार्वजनिक नळांना ‘वॉटर मीटर’ लावेले आहे. ज्या कुटुंबाकडे जागा किंवा नविन नळजोडणी करण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा प्रत्येकी आठ ते १० कुटुंबांना ग्रामपंचायतीने करारनामा करून पाण्याचा लाभ दिला आहे. त्याकरिता मीटरच्या रिडिंगनुसार समप्रमाणात सामूहिकरित्या बील भरतात.‘वॉटर मीटर’चा खर्च अत्यल्पवीज व पाण्याच्या बचतीसह उंच सखल भागात समप्रमाणात पाणी वाटप व्हावे, यासाठी नळजोडणीला ‘वॉटर मीटर’ लावण्यात आले. यासाठी प्रति जोडणी १,८०० रूपये खर्च येतो. यात वॉटर मीटर, एक कॉक, अस्तित्वात असलेली जोडणी बंद करून नविन जोडणी व पाईप लावण्यात येतो.
‘वॉटर मीटर’ने मिटविले गावातील तंटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:30 PM
पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाण्यासाठी सार्वजनिक नळावर होणारे महिलांचे तंटे आता लाखनी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लावलेल्या ‘वॉटर मीटर’मुळे बंद झाले आहेत. परिणामी पाणीपट्टी कराची आकारणीही निम्म्यावर आली आहे.
ठळक मुद्देपाणीपट्टी निम्म्यावर : १५ ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार