अड्याळ : पवनी तालुक्यातील पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी साचल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या बांधकामाने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भंडारा-पवनी महामार्गावरील केवळ तीन हजार वस्तीचे पालोरा ग्रामवासी आज दहशतीखाली जीवन जगत आहेत. नशीब बलवत्तर की गेली दोन दिवसांत मुसळधार पाऊस आला नाही आणि तेही आले असते तर स्थिती अजून बिकट असती. या गावातील जिल्हा परिषद शाळा असो वा चार गावांचा संपर्क असणारा आयुर्वेदिक दवाखाना, रघुते हायस्कूल असो की तिथे तब्बल १४० विद्यार्थी रोज विद्यार्जनासाठी येतात त्या तिन्ही ठिकाणी पाणीच पाणी नियमितपणे साचून राहते आहे. जेव्हापासून महामार्गाचे काम झाले तेव्हापासून गावातील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच बनला नाही. नियमितपणे साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूची साथ गावात पसरण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. तसे झालेच तर याला ग्रामपंचायत प्रशासन वा ग्रामस्थही जबाबदार राहणार नाही. कारण साचलेले पाणी जाण्यासाठी मार्गच बंद झाले. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे मत सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे यांनी व्यक्त केले आहे.
समस्येच्या निराकरणासाठी रघुते हायस्कूल, आयुर्वेदिक दवाखाना तथा ग्रामपंचायत प्रशासनाने एकमेकांना तथा बीडीओ, तहसीलदार, जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अशा संबंधित अधिकारी यांना अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र उपयोग शून्य. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी खासदार,आमदार यांचेही दुर्लक्ष होत असल्याची खंतही सरपंच गिऱ्हेपुंजे यांनी व्यक्त केली.
गावातील महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वस्ती, शाळा व आयुर्वेदिक दवाखान्यात जाण्यासाठी ग्रामस्थांना रस्ताच दिसेनासरा झाला आहे. सध्याच्या दिवसात डेंग्यूचे ग्रहण लागल्यासारखेच आहे; पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अजूनपर्यंत गावात एकही डेंग्यूचा रुग्ण नाही. हातावर हात देऊन राहणेसुध्दा चुकीचे ठरेल. यासाठी जिल्हा तथा तालुका प्रशासन गावात साथ पसरल्यानंतर आरोग्य यंत्रणा लावण्या आधीच आत्ताच आरोग्य यंत्रणा गावात कामाला लावावी आणि गावात साचलेल्या पाण्याचा कशाप्रकारे निचरा होईल यासाठी प्रयत्न करावे, अशीही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.