आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
अडयाळ : सतत मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे गावातील काही नाल्या साफ झाल्या, तर काही नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले. अशोकनगरातील बनलेल्या काही नाल्यांचा उपयोग शून्य आहे. कारण पाणीच निघेनासे झाले आहे. तर त्या नगरातील मोकळ्या भूखंडात साचलेल्या आणि होणाऱ्या दुर्गंधीचा सामना दरवर्षीप्रमाणे कदाचित यावर्षीसुद्धा करावा लागणार की काय? असाही प्रश्न तेथील ग्रामस्थांना पडून आहे. येथील परिस्थिती याचप्रकारे होत असते. मग ही बाब गंभीर नाही का? असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
गावातील समस्या, बिकट परिस्थितीही एकावेळेस दूर होत नाही. गावातील नाल्यांची स्थिती असो वा या अशोकनगरातील. किती नाल्या खोदून, शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा वापर करून, जेव्हा नाल्या बनल्या, तेव्हा ग्रामस्थांना वाटायचं की आता समस्या दूर होणार; पण शोकांतिका अशी आहे की, कुठे नालीतील पाणी पुढे जात नाही, तर कुठे काही ग्रामस्थांच्या चुकांमुळे पाणी पुढे जात नाही. नाल्या अद्याप उपसाच झाल्या नाहीत. याबाबत ग्रामवासी स्पष्ट आणि निर्भीडपणे समस्या मांडत जातात, पण कारवाई होत नाही. अडयाळ ग्रामपंचायत प्रशासन आता या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करणार आहे की नाही, असा प्रश्न ग्रामवासी विचारत आहेत.