तुमसर : देव्हाडी परिसरातील एका औषध निर्माण करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक पाणी नाल्यात सोडण्यात आले. नाल्या काठावरील सुमारे ५५ शेतकऱ्यांना धान रोवणी करणे थांबवावी लागली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत असंतोष व्याप्त आहे.तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर एक औषध निर्माण करणारा कारखाना आहे. या कारखान्यातील रासायनिक विषारी पाणी जवळच्या नाल्यात सोडण्यात आले. हे विषारी पाणी एका कोल्हापुरी बंधाऱ्यात थांबले. सुमारे ५५ शेतकऱ्यांच्या शेतात हे विषारी पाणी गेले. त्यामुळे नाल्या काठावरील शेतकऱ्यांनी धानाची रोवणी रोखली.या पाण्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते. हे पाणी जिथे थांबले तिथे गवत अक्षरश: जळाले आहे. शरीराचा संपर्क या पाण्याचा झाला तर जिवाला धोका आहे. काही महिन्यापूर्वी एका मशीने पाणी पिल्याने ती दगावली होती. यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. देव्हाडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. राज्य व केंद्राचे मोठे कडक कायदे आहेत. परंतु या नियमांचा येथे उपयोग होताना दिसत नाही. रासायनिक पाणी नाल्यात सोडल्यावर हे पाणी नदीत जाते. यामुळेही धोका होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
रसायनमिश्रित पाणी सोडले नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 1:51 AM