भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या लहरीपणाने भरपावसाळ्यात जलसाठे अद्यापही निम्मेच भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ३३ टक्क्यांनी घट आहे. यावर्षी शुक्रवारपर्यंत ६३ प्रकल्पांत केवळ ४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
१ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरात ९०५.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ७२८.६ मिमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यापासून पावसाचा जाेर वाढताे. मात्र, मध्यंतरी अनेक दिवस पावसाने हुलकावणी दिली हाेती. यामुळे अनेक शेतकऱ्यांची धानाची राेवणी हाेऊ शकली नाही. गत तीन दिवसांपूर्वी पावसाला सुरुवात झाली आहे. तरीही काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. भंडारा जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत चार मध्यम, ३१ लघु प्रकल्प, तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. २० ऑगस्ट राेजी ६३ प्रकल्पांत एकूण ४९.४८ दलघमी उपयुक्त साठा असून, त्याची टक्केवारी ४०.६३ एवढी आहे. गतवर्षी याच दिवशी एकूण ८५.६२ दलघमी उपयुक्त साठा हाेता. त्याची टक्केवारी ७०.३३ एवढी हाेती. २०१९ची आकडेवारी लक्षात घेता २० ऑगस्ट राेजी ६७.३६ दलघमी उपयुक्त साठा असून, त्याची टक्केवारी ५५.३३ एवढी हाेती.
बाॅक्स
हलक्या धानाची मुदत संपली
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे शेतकरी कमी कालावधी येणाऱ्या धानाची लागवड करतात. याला हलके धान संबाेधले जाते. यावर्षी पावसाने जुलै महिन्यात दडी मारली. सिंचनाची सुविधा असलेल्यांनी राेवणी आटाेपली. मात्र, सिचंनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना राेवणीपासून मुकावे लागले. आता दाेन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस आहे. मात्र, हलक्या धानाची मुदत संपल्याने शेतकरी राेवणी करण्यास असमर्थ आहेत.