पाणी टंचाई आराखडा नावापुरता : बारा हजार रुपयांच्या पाण्याची विक्रीमोहाडी : मानवाला दैनंदिन वापर, शेती, उद्योग, विद्युत आदी बाबींसाठी तसेच अन्य सजिवांच्या अस्तित्वासाठी पाणी हवे. तथापि, पाण्याच्या संकटाची तिव्रता वाढत आहे. त्यासाठी पाणीटंचाई आराखडा मंजूर होतो. पण, पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी निधीच वेळेवर उपलब्ध करुन दिला जात नाही. परिणामी पाणी टंचाईचा आराखडा केवळ नावापूरता तयार केला जातो. याच बाबीचा लाभ बॉटलीबंद पाण्याच्या विक्रीसाठी होत आहे.शेती, उद्योग तसेच घरगुती वापरासाठी भूगर्भजलाचा अतिरिक्त वापर केला जात असल्याने भूजलपातळी वेगाने कमी होत आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्याची तिव्रता अधिक जानवत आहे. त्यासाठी प्रशासन स्तरावर दरवर्षीच पिण्याचे पाणी टंचाई निवारणासाठी आराखडा तयार केला जातो. टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित केल्या जातात. उपाय योजनांवर किती खर्च अपेक्षित असेल हेही ठरविण्यात येतो. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडून उपाययोजनाद्वारे कोणती कामे प्राधान्याने घ्यावयाची असतात. याचा सर्वेक्षण भूवैज्ञानिकच्या चमूकडून केला जातो. तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरी केलेला प्रपत्र ब भरुन शिफारशीसह प्रशासकीय मंजूरीसाठी जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे पाठविला जातो. ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद भंडारा येथील भूवैज्ञानिक चमूने ८ फेब्रुवारी रोजी प्रपत्र भरुन प्रशासकीय मंजूरीसाठी प्रपत्र ब सादर करण्यात आले. मोहाडी तालुक्याचा पाणी टंचाई आराखडा जानेवारी ते मार्च २०१७ तयार केला गेला. मार्च अखेरपर्यंत विहिर खोल करणे, विहिरीतील गाळ काढणे, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे, आदी कामे प्रस्तावित करुन ५ जानेवारी २०१७ रोजी प्रस्तावित कामांना जिल्हाधिकारी भंडारा यांनी मंजूरी दिली होती. आराखडा मंजूर करण्यात आला. पाणी टंचाई निवारणासाठी मार्च अखेर मंजूर कामे करायची होती. पण, जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडून कामांना प्रशासकीय मंजूरी व ८ लक्ष ७७ हजार रुपये निधीची आवश्यकता अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे शिवनी, मुंढरी खुर्द, पांजराबोरी, खमारी बू., रोहणा, आंधळगाव, निलज बू, धुसाळा येथे विधन विहिरी, मलिदा, पांजरा ग्राम, वासेरा येथे विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, खमारी बू येथे विहिरी खोल करणे, गाळ काढणे ही उपाययोजना मार्च पूर्ण होवून करता आली नाही. तसेच एप्रिल ते जून २०१७ च्या पाणी टंचाई आराखडाही तयार करुन मंजूर करण्यात आला.विहिरी खोल करणे विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे अशी २४ कामे करावयाची आहेत. यासाठी १४ लक्ष ६२ हजार रुपये खर्च येणार आहे. या प्रस्तावित कामे करण्यासाठी २१ गावांची निवड करण्यात आली आहे. यात चिचोली, सिरसोली, पांजरा/ बोरी, बोरी, खडकी, डोंगरदेव, पालोरा, पारडी, वडेगाव, खुटसावरी, चिचखेडा, भोसा, हिवरा, पाचगाव, रोहा, सालईबूज, उसर्रा, देव्हाडा खू, हरदोली/ झंझाड, डोंगरगाव, टाकला ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भूवैज्ञनिक चमूकडून सर्वेक्षण होणे अपेक्षीत होते. अजूनही सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे पाणी टंचाई आराखडा व त्याचावरचा निवारण केवळ कागदावरच केला जातो असे निर्देशनास आले आहे. प्रखर उन्हाळा तापतोय पाण्याची भिषणत: जाणवू लागली आहे. प्रशासकीय कारभार करणारे अधिकारी वातानुकूलीत ठिकाणी बसत असल्याने त्यांना पाणी टंचाईची प्रखरता व गंभीरता कशी कळणार असा सवाल निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)मोहाडीत पाण्यासाठी पायपीटमोहाडी येथे दरवर्षीच पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला उन्हाळ्याच्या मोसामात संघर्ष करावा लागतो. जलस्वराज्य व इतर पाणी पुरवठा कुचकामी ठरली. अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविता आला नाही. दोन दिवसानी नळाला पाणी येतो. तेही दिवसभर पुरेल इतका पाणी मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे मोहाडीत पिण्याचा पाण्याची तिव्रता, टंचाई सहनशिलतेची कसोटी पाहणारी आहे. मोहाडीत चार आरो प्लांट आहेत. त्यामुळे दर दिवशी बारा हजार रुपयाचा पाणी मोहाडी व शेजारील गावात विकला जातो. यामुळे मोहाडी मध्ये असणारी तिव्र पाणी टंचाई बॉटली, कॅन बंद पाण्याचा विक्रीला वरदान ठरली आहे.
पाणी टंचाई ठरली बाटलीबंद पाण्याला वरदान
By admin | Published: April 07, 2017 12:37 AM