यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी वैनगंगा नदीपात्रात अकादमीच्या खेळाडूंचा सराव सुरू असताना पाहून स्वतः खेळाडूंसोबत नौकानयन केले. यावेळी अकादमीचे मुख्य मार्गदर्शक राजेंद्र भांडारकर यांच्याशी चर्चा करून त्यांनी खेळाडूंसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बोटीत बसून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. खेळाडूंनी केलेली प्रगती पाहून क्रीडाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पुढील वर्षात अकादमीने राष्ट्रीय स्पर्धा आयोजित कराव्यात. यासाठीसुद्धा जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मुख्य मार्गदर्शक राजेंद्र भांडारकर यांनी भंडारा जिल्ह्याला अशाच धाडसी खेळावर प्रेम असणाऱ्या कलेक्टर साहेबांची नितांत आवश्यकता आहे, जेणेकरून जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर भंडारा जिल्ह्याचे नावलौकिक करतील असे सांगितले. यावेळी आंतरविद्यापीठ पदकप्राप्त खेळाडू अविनाश निंबार्ते, कुलदीप वंजारी, सुधीर साळवे यांचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वॉटर स्पोर्ट अकादमीच्या खेळाडूंचा कारधा येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:41 AM