मानेगाव (बाजार) : पावसाने दीर्घकालीन दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळावे यासाठी टेकेपार उपसा सिंचनाचा शेतीला पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. परिसरातील मकरधोकडा, झबाडा, मकरधोकडा, टेकेपार, विड्डी, अर्जूनी, बोरगाव, खोलापूर, गराडा, मेंढा येथील शेतकऱ्यांची भात पिकांची पेरणी झालेली आहे. अपूऱ्या व अनियमित पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांची धानपिकाची पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावंर आर्थिक संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून अशा संकटकालीन परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून येत्या दोन दिवसात टेकेपार उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला सोडण्यात यावे अन्यथा सामाजिक कार्यकर्ता व शेतकरी नरेश येवले यांच्या नेतृत्वाखाली मानेगाव बाजार चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल तसेच समस्त शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा परिषद सदस्य नरेश डहारे, पंचायत समिती. सदस्या मनिषा वाघमारे, ईश्वर कळंबे आदी शेतकऱ्यांनी दिलेला आहे. (वार्ताहर)
टेकेपार उपसा सिंचनाचा शेतीला पाणीपुरवठा करा
By admin | Published: August 01, 2015 12:15 AM