०४ लोक १७ के
लाखांदूर : ग्रामपंचायत क्षेत्रातील खासगी नळ जोडणीधारक कुटुंबांसह गावकऱ्यांकडून पाणी कराचा भरणा होत नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकीत आहे. वीज खंडित केल्याने तब्बल एक महिन्यापासून पाणीपुरवठा योजना बंद असल्याची माहिती आहे. तालुक्यातील दहेगाव माइन्स येथे ही घटना उघडकीस आली आहे.
सुमारे १५८३ लोकसंख्या असलेल्या दहेगाव माइन्स येथे गत काही वर्षांपासून ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
सदर योजनेंतर्गत गावात १५० पेक्षा अधिक खासगी नळजोडणीधारक कुटुंबे असून ग्रामपंचायतीला दरवर्षी जवळपास २ लाख १९ हजार रुपयांचा पाणी कर अपेक्षित आहे. मागील दोन वर्षांपासून येथील नागरिकांकडून पाणी कराचा अनियमित भरणा केला जात असल्याने या योजनेचे वीजबिल थकीत होऊन वीज कंपनीने महिनाभरापूर्वी वीजपुरवठा खंडित केला आहे.
परिणामी या गावातील ग्रामीण पुरवठा योजना बंद पडली असून गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे बोलले जात आहे.
गावात १५ सार्वजनिक हातपंप अस्तित्वात असले तरी संबंधित हातपंपाचे पाणी पिण्याअयोग्य असल्याने सध्या येथील गावकरी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत असल्याचीदेखील माहिती आहे. तब्बल एक महिन्यापासून पाणीपुरवठा योजना बंद असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून नियमित करवसुलीसाठी गावकऱ्यांकडे तगादा लावला जात असतानादेखील हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे.