सुनील मेंढे : घनकचरा निर्मूलनासाठी पुढाकार घेणारभंडारा : शहरातील पाणीटंचाई व दूषित पाणीपुरवठा या समस्येवर मात करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. १०९ कोटी रूपयांच्या या योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असून नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’ची गरज पडणार नाही, असा विश्वास नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.यावेळी ते म्हणाले, भंडारा शहरात सद्यस्थितीत जी पाणीपुरवठा योजना आहे, त्यानुसार दोन जलकुंभाच्या माध्यमातून ४४ लाख लिटर पाण्याचा प्रतिदिन पुरवठा केला जाऊ शकतो. परंतु, विविध समस्यांमुळे तितक्या क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. आता शासनाला सादर केलेल्या १०९ कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेनुसार अतिरिक्त चार टाकी शहरातील विद्यानगर, शास्त्रीनगर, खातरोड व एमएसईबी कॉलनीत बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. पाईपलाईन जुनी झाली असल्याने जास्त व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला जलशुद्धीकरण बंद करून दसरा मैदानावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जाणार आहे. या योजनेनुसार नागरिकांना प्रतिदिन किमान १३५ लिटर स्वच्छ पाणी पुरवण्यात येणार असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले. शहरात भुयारी गटार योजनेचा प्रकल्प तयार करण्यात आलेला असून त्यावर १२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम शासनाने निश्चित केले आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे. शहरातील मिस्कीन टँक व हुतात्मा स्मारक या दोन बालोद्यानांचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी चौक ते लायब्ररी चौकादरम्यान पायलट रस्ता पावसाळ्यापुर्वी तयार केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून चार हजार घरे बांधण्यात येतील, असेही मेंढे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, नितीन धकाते, मंगेश वंजारी, रजनीश मिश्रा यांच्यासह मुख्याधिकारी अनिल अढागळे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)चार कोटींची करवसुलीनगर पालिकेने राबविलेल्या विशेष करवसुली मोहिमेत पालिकेच्या तिजोरीत ४ कोटी ८ लाख रूपये जमा झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ७५ लाख रूपये अधिक वसूल झाले आहेत. बाजारात सुविधा आणूशहरातील छोटा बाजार चौकाचे नियोजन करून भाजीपाला विक्रेत्यांना एकत्रित आणून बाजारातील अव्यवस्था तातडीने दूर करण्यात येईल. मोठा बाजारासाठी विकास योजना तयार करण्यात येणार असून अतिक्रमण काढून रस्ते रूंद केले जाणार आहेत. लहान व्यापाऱ्यांसाठी जागा निश्चित करून शहरात फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले.
भंडारा शहरासाठी १०९ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 12:23 AM