युवराज गोमासे
भंडारा : मोहाडी तालुक्यातील करडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनचा पाईप फुटल्यामुळे दोन दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी हुडहुडत्या थंडीत भटकंती करावी लागत आहे. प्रकरणी नागरिकांत असंतोषाची भावना असून तातडीने सुधारणा करून पाणी प्रश्न सोडविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मोहाडी तालुक्यातील करडी गावाची लोकसंख्या ६ हजारापेक्षा अधिक आहे. गावासाठी सन २०१२ मध्ये १८ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूरी करण्यात आली होती. त्यावेळी पाणीपुरवठा करणारी विहीर ते पाण्याच्या टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. परंतु, पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाची करण्यात आले. पाईपलाईन अंदाजपत्रकाप्रमाणे जमिनीत तीन फूट न गाडता १ फूट ते दिड फुट खोल जमिनीत गाडल्या गेली. त्यामुळे ही पाईपलाईन वेळोवेळी फुटून करडीवासियांना वेळोवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सदर प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभाग तुमसर यांचेकडे लेखी तक्रारीतून मांडला होता.
चौकशी करून कारवाई करण्याकरिता लेखी तक्रार दिली होती. करडी येथील गांधी चौकात तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी घेतलेल्या जनता दरबारात सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर दडपण आणून सदर कामाची चौकशी होऊ दिली नाही. त्यामुळे योजना अयशस्वी ठरली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.२०१२ साली नवीन पाईप लाईन कामकाजाला व योजनेला कडाडून विरोध केला. त्यामुळे ही पाईपलाईन आत्तापर्यंत ग्रामपंचायतीस हस्तांतरित झालेली नाही. परंतु, त्यानंतर ग्रामपंचायतीने लाखो रुपये दुरुस्तीच्या नावावर उधळले आहेत. नागरिकांचा टॅक्सचा पैसा पाण्यात टाकण्यात आला आहे.दिवाळीला करडी ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर होवून निलीमा इलमे सरपंचपदी आरूढ झाल्या आहेत. परंतु, नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीपासून पाणी पुरवठा योजनेची मुख्य पाईप लाईन लिकेज झाल्याने गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. तात्पुरते दुरूस्तीचे काम ग्रामपंचायतीचेवतीने हाती घेण्यात आले आहे. परंतु, गावात पिण्याचे खारट पाणी असल्याने गोड पाण्यासाठी गावाबाहेर भर थंडीत भटकंती करावी लागत आहे.
नव्या ५ करोडच्या योजनेला द्यावी गती
सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांवर दोष देण्याचे रडगाणे गात बसण्यापेक्षा नव्याने मंजूर झालेली ५ करोड रूपयाची योजना तातडीने कार्यान्वीत करून कामाला गती देण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला कळविण्याची गरज आहे. तसेच गावातील योजनेवर विद्युत बिलापोटी होणारा मोठ्या निधीची बचत होण्यासाठी पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
मुख्य पाईप लाईन जिर्ण असल्याने वारंवार फुटते आहे. दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी नवी ५ करोडची योजना गावाला मंजूर झाली आहे. योजनेचे काम सुरू आहेत. लवकरच जुन्या योजनेच्या लिकेजचे काम पूर्ण होवून पाणी पुरवठा सुरळीत होईल.- निलीमा इलमे, सरपंच, करडी.